पुणेबातम्या

पुण्यात सहा दिवसांत झाले इतक्या हजार गणेशमूर्तीचे विसर्जन !

उत्सवाच्या सहाव्या दिवशी गौरीबरोबरच १२ हजार ५१५ गणेशमूर्तीचे विसर्जन महापालिकेने उभारलेल्या विविध भागांतील विसर्जन घाटांवर झाले.

पुणे : गणेशोत्सव काळात पुणे महापालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन उपक्रमाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत लोखंडी टाक्या, सिमेंटचे हौद यांमध्ये ५३ हजार ८५२ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. या काळात सुमारे ६८ हजार ६३३ किलो निर्माल्य गोळा केले आहे. उत्सवाच्या सहाव्या दिवशी गौरीबरोबरच १ हजार ५१५ गणेशमूर्तीचे विसर्जन महापालिकेने उभारलेल्या विविध भागांतील विसर्जन घाटांवर झाले.


गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी ‘श्रीं’ची मूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जित न करता घाटांवर उभारण्यात आलेल्या लोखंडी टाक्या, तसेच हौदांमध्ये करावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. मूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून जनजागृती सुरू केली आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले. यासाठीची यंत्रणा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गेल्या काही आठवड्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
महापालिकेने तयार केलेल्या लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित झालेल्या मूर्ती ३४ हजार ११९ असून, हौदांमध्ये ८ हजार ४०२ विसर्जित झाल्या. महापालिकेने उभारलेल्या संकलन केंद्रात ११ हजार ३३१ मूर्ती जमा करण्यात आल्या. या सहा दिवसांमध्ये ६८ हजार ६३३ किलो निर्माल्य जमा करण्यात आल्याचे उपायुक्त वारुळे यांनी सांगितले.

विसर्जनाच्या दिवसांमध्ये विसर्जन घाटांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे, मूर्ती संकलनाची व्यवस्था प्रत्ये घाटावर करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करतानाच पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून शाडू माती संकलित करून तिचा पुनर्वापर केला. गेल्या वर्षी २०२५ मध्ये सुमारे ३९ टन शाडू माती संकलित करण्यात आली. तसेच, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीचा उपक्रमदेखील राबविण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवात महापालिकेने बांधलेल्या हौदांमध्ये १ लाख १३ हजार १३६ मूर्ती, लोखंडी टाक्यांमध्ये ३ लाख ६२ हजार ३१९ मूर्ती, तर १ लाख ७८ हजार ९५५ ‘श्रीं’ च्या मूर्ती संकलन केंद्रांवर विसर्जित करण्यात आल्या. अशा एकूण ६ लाख ५४ हजार ४१० गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. तर ९ लाख २३ हजार ३९८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.

महापालिकेने केलेली तयारी पूर्ण….

नदीपात्रांमध्ये ३७ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था

शहरातील विविध ३५ घाटांवर विसर्जनाची सोय

  • शहरातील ३८ ठिकाणी ६९ कृत्रिम हौदांची व्यवस्था
    २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची सोय

४ तलाव, ७ विहिरींमध्ये विसर्जन व्यवस्था

  • कॅनॉलवर ४१ ठिकाणी होणार विसर्जन
  • निर्माल्य कलश/कंटेनर २७४ ठिकाणी, ३२८ कलश

मूर्तिसंकलन/दानकेंद्रे : २४१