यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!
- आमदार शंकर भाऊ जगताप यांचा पाठपुरावा
- ८.३३ टक्के प्रथा बोनसासह ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

पिंपरी, 14 ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा वाढीव सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारा ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामध्ये वाढ करून आता ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने उपसूचनेसह मंजुरी दिली आहे.
सन २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करारनामा करण्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उपसूचनेसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळीचा प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासाठी पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला. या मागणीसाठी आमदार शंकर जगताप यांनीही पुढाकार घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यानुसार ८.३३ टक्के प्रथा बोनसासोबत पूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद होती. मात्र, स्थायी समितीने उपसूचना मंजूर करून ही रक्कम २५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या कुटुंबीयांचीही यंदाची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे. अंतिम मंजुरीनंतर वाढीव सानुग्रह अनुदानाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
