भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर,राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीत कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी दि. १४ ऑगस्ट २०२६:- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम नगर मध्ये उद्या, १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयापासून दुपारी ३ वाजता या रॅलीला सुरुवात होणार असून, सुमारे तीन किलोमीटर अंतराचा प्रवास करून रॅली पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर होणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आज(दि.१४) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या रॅलीसाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रविजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे, गटनेते प्रशांतजी शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून ते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले हे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार देशभर तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर पिंपरी-चिंचवड शहरातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.गेली ३० वर्ष झाले १५ ऑगस्टला सकाळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयावर झेंडा वंदन होत असते.तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. हा तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणे आणि देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या सर्वांचे महत्वाचे कर्तव्य आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. ज्यांनी-ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, त्यांची आठवण आपल्या स्मृतीमध्ये ठेवावी आणि देशाला अभिवादन करावं.शहरातली पिंपरी-चिंचवड कामगार नगरी आहे. त्यामुळे कामगार नगरीचे एक अभूतपूर्व वैभव आहे.
संत तुकाराम मधील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरूवात होईल. गंगानगर, महेशनगर त्यानंतर ॲटलॉस कॉलनी मार्गे डी.वाय.पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल आणि तेथून संपूर्ण फेरा मारून आचार्य आत्रे रंगमंदिर पासून ते पुन्हा खाली येईल आणि सभेच्या ठिकाणी सांगता होईल. एक हजाराच्या वरती नागरिक रॅलीमध्ये सहभागी होतील. यावेळी सु सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक उद्या या रॅलीमध्ये सहभागी होईल.
रॅली सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.“१५ ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस आहे. देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या रॅलीत सहभागी व्हावे. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून राष्ट्राला अभिवादन करूया.पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरातील शेकडो कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
