सेक्टर 23 मधील प्रस्तावित’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प रद्द करा..
माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांची आयुक्तांकडे मागणी
नागरिकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी, दुर्गा टेकडीचे पर्यावरण आणि विकास आराखड्याचा मुद्दा केला उपस्थित…

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी (दि. 26) :- रावेत, प्राधिकरणातील आकुर्डी सेक्टर २३ येथे प्रस्तावित सुमारे एक हजार टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे यांनी महानगरपालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. दुर्गा टेकडी आणि जलशुद्धीकरण केंद्रालगत प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ,आर एस कुमार ,समीर मोरे आदी उपस्थित होते.
प्राधिकरण, रावेत आणि आकुर्डी परिसरात सुमारे १.२५ ते १.५० लाख नागरिक वास्तव्यास असल्याचा प्राथमिक अंदाज असून, या भागात नामांकित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये आहेत. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पातून होणारे संभाव्य प्रदूषण विद्यार्थ्यांच्या, रुग्णांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. कचऱ्याच्या प्रक्रिया व ज्वलनातून निर्माण होऊ शकणारे PM2.5 सूक्ष्म धूलिकण, नायट्रोजन ऑक्साइड्स, डायऑक्सिन्स आणि फ्युरान्स यांमुळे श्वसनविकारांसह दीर्घकालीन आरोग्यधोक्यांची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रकल्प जलशुद्धीकरण केंद्रालगत असल्याने दूषित पाणी, राख आणि घातक घटकांच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे भूजल व जलस्रोतांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली आहे. भविष्यातील जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्ताराचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुर्गा टेकडीवरील वृक्षसंपदा, पक्षी, नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधता उद्यानाच्या मंजूर आराखड्याचे संरक्षण करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्राधिकरणातील नागरिकांनी नियोजनबद्ध निवासी परिसराच्या अपेक्षेने घरे खरेदी केली असून, प्रस्तावित जागा मंजूर विकास आराखड्यात कचरा डेपो किंवा वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दर्शविली होती का, याबाबत महानगरपालिकेने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. दररोज एक हजार टन कचऱ्याच्या वाहतुकीमुळे वाहतूककोंडी, धूळ, दुर्गंधी आणि अपघातांचा धोका वाढू शकतो. कचऱ्याला आग लागण्याची शक्यता, उत्सर्जन नियंत्रण, राखेची विल्हेवाट तसेच देहूरोड आयुध निर्माणीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक निर्बंधांचाही विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकल्प रद्द करून जागेच्या हस्तांतरणाची व उभारणीची प्रक्रिया थांबवावी, कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, पुनर्वापर, बायोमिथेनेशन आणि विकेंद्रित प्रक्रिया प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, तसेच नागरिक, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. शहर कचरामुक्त करण्यास विरोध नसून नागरिकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण धोक्यात घालून विकास करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
- “रावेत सेक्टर २३ येथील प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी आणि दुर्गा टेकडीच्या पर्यावरणावर संभाव्य परिणाम होण्याची चिंता आहे. शहर कचरामुक्त करण्यास आमचा विरोध नाही; मात्र नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करून विकास नको. त्यामुळे हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा. कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि विकेंद्रित प्रक्रिया प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मी आयुक्तांकडे केली आहे.”
— सौ. शैलजा अविनाश मोरे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका पिं.चि.मनपा…
