बातम्या

मेट्रोच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; उपमहापौर शर्मिला बाबर यांची मागणी

टिळक चौक ते मोरवाडी दरम्यानच्या रस्त्यांची दुरवस्था; मेट्रोचे मुख्य कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांना निवेदन

पिंपरी, दि. २० नोव्हेंबर २०२६ : निगडी ते मोरवाडी मेट्रो मार्गावरील टिळक चौक ते मोरवाडी दरम्यान रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पुणे येथील कार्यालयात भेट देऊन मुख्य कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.

मेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. विशेषतः दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येचे तातडीने निराकरण होणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर उपमहापौर बाबर यांनी संबंधित रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित राहील, यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना व आवश्यक वाहतूक व्यवस्थापन करण्याची सूचनाही केली.

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाची कामे विनाविलंब पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केली.