बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; १ कोटी ७२ लाखांच्या संशयित बोगस औषधांचा साठा जप्त

वायसीएम रुग्णालयात ईडीची धडक कारवाई!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ईडी आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील मध्यवर्ती औषध भांडारात तपासणी केली. या कारवाईदरम्यान तब्बल १ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा संशयित बोगस औषधसाठा आढळल्याची प्राथमिक माहिती आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी पथकासह रुग्णालयात दाखल होत औषधसाठ्याची तपासणी सुरू केली. औषधांची खरेदी, पुरवठा, गुणवत्ता आणि वितरण प्रक्रियेची पडताळणी करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या किमतीचा संशयित औषधसाठा आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात एवढ्या मोठ्या किमतीचा संशयित औषधसाठा आढळल्याने औषध खरेदी आणि पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. औषधांचा पुरवठा कोणी केला? औषधांची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? खरेदी आणि वितरण प्रक्रियेत अनियमितता झाली आहे का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा सविस्तर तपास अहवाल, जप्त औषधांची माहिती आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिका याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित एवढे गंभीर प्रकरण समोर आल्याने पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष आता पुढील कारवाईकडे लागले आहे.