महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कलावंत सुहास दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन गौरव…

पिंपरी, २० नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी रंगभूमी, लोककला आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ कलावंत, अभिनेते व दिग्दर्शक सुहास दामोदर जोशी यांना आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुहास जोशी यांनी मराठी रंगभूमी, लोकनाट्य, एकांकिका, निवेदन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ५० हून अधिक नाटके आणि ४० हून अधिक एकांकिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल गंध, बोलीभाषेतील सहजता आणि व्यक्तिरेखांमधील वास्तवता ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये आहेत.
कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक महोत्सवांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ५० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. लोककला संमेलने, अभिजात मराठी सप्ताह तसेच कथाकथनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठीही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्य नाट्यस्पर्धांचे परीक्षक म्हणून काम करत नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्याचे कार्यही ते करत आहेत.
त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेचा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करणे ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे,त्यांच्या पुढील कला वाटचालीसाठी महापौर रवि लांडगे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व संस्कृती समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे,नगरसदस्य सुरेश भोईर,अनंत को-हाळे,नगरसदस्या मनिषा चिंचवडे तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम उपस्थित होते.मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
