पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत २० वर्षीय आर्याचे कालनिर्णायक धाडस! ६० ते ७० लोकांचे प्राण वाचवणाऱ्या आर्याला ‘शौर्य पुरस्कार’ द्या – आमदार अमित गोरखे

पिंपरी चिंचवड, ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगला २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे साधारण २ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहने जळून खाक झाली. मध्यरात्रीच्या सुमारास पसरलेला धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीतील नागरिक संकटात सापडले असताना, अवघ्या २० वर्षांच्या आर्या कांबळे हिने दाखवलेल्या असीम धाडस आणि प्रसंगावधानामुळे ६० ते ७० रहिवाशांचे प्राण वाचले. स्वतःच्या जीवाची व दुखापतीची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आर्या कांबळे हिच्या या साहसाची शासनाने दखल घेऊन तिला ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करावा, अशी मागणी भाजप विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
पार्किंगमधील आगीचा थरार आणि गॅलरीतून उडी
घराचे दार उघडत नसतानाही आर्याने अजिबात न घाबरता सर्वप्रथम अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. या उडीमुळे तिच्या पायाला दुखापत झाली; परंतु स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती संपूर्ण इमारतीत धावली आणि गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जागे करून सुरक्षितपणे गच्चीवर (टेरेसवर) जाण्याचे निर्देश दिले. सर्व नागरिक सुरक्षित बाहेर पडल्याची खात्री तिने करून घेतली. वेळेवर घेतलेला हा निर्णय आणि दुखापत झालेली असतानाही दाखवलेले शौर्य खरोखरच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. अशा संकटकाळी असाधारण संयम दाखवून अनेकांचे आयुष्य वाचवणाऱ्या आर्या कांबळे हिच्या साहसाचा सन्मान ‘शौर्य पुरस्कारा’ने व्हावा, अशी भावना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली आहे.
आर्याच्या असीम धाडसाची शासनाने दखल घ्यावी
चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीत घडलेली आग दुर्घटना अत्यंत धक्कादायक होती. मध्यरात्रीच्या वेळी इमारतीमधील ६० ते ७० रहिवासी गाढ झोपेत असताना ही आग लागली होती. अशा बिकट आणि जीवघेण्या प्रसंगात अवघ्या २० वर्षांच्या आर्या कांबळे हिने दाखवलेले असीम धाडस, संयम आणि प्रसंगावधान खरोखरच थक्क करणारे आहे. स्वतःच्या पायाला दुखापत झालेली असतानाही तिने स्वतःचा विचार न करता संपूर्ण इमारतीत धाव घेऊन शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले. एका तरुणीने दाखवलेले हे शौर्य संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे या अतुलनीय साहसाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि आर्या कांबळे हिला अधिकृतपणे ‘शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करावे, हीच शासनाकडे आग्रही मागणी आहे. – आमदार अमित गोरखे
