चिंचवड महानगरपालिकेने एसकेएफ कंपनी यांचे सीएसआर उपक्रमातून स्थापन केले देशातील पहिले गव्हर्मेंट कार्पोरेट कौशल्य विकास सीड सेंटर.
युवकांसाठी कौशल्यातून रोजगाराच्या वाटा

पिंपरी दि.३० ऑक्टोबर २०२६:- कौशल्य प्रशिक्षणाला उद्योगांच्या गरजांची जोड देत रोजगाराच्या संधींपर्यंत युवकांना पोहोचविण्यासाठी महापालिका आयटीआय मोरवाडी विभाग यांचे सहयोगाने एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल) लिमिटेडच्या पहिल्या ‘एसकेएफ एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट(सीड) केंद्राचा चिखलीतील जाधववाडी येथे शुभारंभ झाला.
पहिल्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना ३०० तासांच्या अभ्यासक्रमातून शॉप फ्लोअर टेक्निशियन आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रीशियन या भूमिकांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण आणि उत्पादन क्षेत्रातील सुरक्षित कार्यपद्धतींसह संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व व कार्यस्थळ कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) प्राथमिक ओळख यांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. प्रशिक्षणापासून नोकरी मिळविण्याच्या प्रक्रियेपर्यंत विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाईल.
किमान दहावी/बारावी, आयटीआय व इतर शिक्षण उत्तीर्ण युवकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम खुला आहे. उत्पादन क्षेत्रातील करिअरमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी विशेष संपर्क व जनजागृती प्रयत्न केले जाणार आहेत.
कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (भाप्रसे), अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम (भाप्रसे), सहआयुक्त मनोज लोणकर, प्राचार्य शशिकांत पाटील, विष्णू साबळे, विक्रम आळोखे, सोमनाथ शिंदे उपस्थित होते.
एसकेएफतर्फे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै, कंपनी व्यवस्थापक प्रशांत हांडे, सीएसआर व शाश्वतता प्रमुख शशी शेट्टी, सीएसआर लीड मयूर देशमुख आणि कम्युनिकेशन लीड प्रियंका दास उपस्थित होते. टाटा स्ट्राइव्हतर्फे अनिता राजन, प्रदीप लिंगावत, व्यंकट रायडू, श्वेता बक्शी, अक्षय शेट्टी, प्रणोती आवलेकर आणि रमेश बलवड़कर आदी उपस्थित होते.
एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल)चे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै यांनी सांगितले की, भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांइतकेच कुशल आणि आत्मविश्वासाने काम करणारे मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. ‘सीड’च्या माध्यमातून उद्योग, प्रशासन आणि विकास भागीदारांना एकत्र आणून प्रत्यक्ष तांत्रिक शिक्षण, डिजिटल व एआय सज्जता, मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आणि रोजगारासाठी सहाय्य दिले जाणार आहे. युवकांच्या आकांक्षांचे रोजगारक्षमतेत रूपांतर करून संधींचा विस्तार करणे, सर्वसमावेशकता वाढविणे बाबत नमूद केले.
या भागीदारीत महापालिका संस्थात्मक पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील सहाय्य पुरवते. टाटा स्ट्राइव्ह युवकांचे कौशल्य प्रशिक्षण व रोजगारक्षमता विकासातील अनुभव उपलब्ध करून देते; तर बॉश इंडिया फाउंडेशन उद्योगमानकांवर आधारित शॉप फ्लोअर अभ्यासक्रम, प्रशिक्षकांचा विकास आणि प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन यासाठी योगदान देते. या समन्वयातून प्रशिक्षण अधिक उद्योगाभिमुख करण्यावर भर आहे.
टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) अमेया वंजारी यांनी कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. उद्योगांचा अनुभव, प्रशासनाचे सहकार्य आणि टाटा स्ट्राइव्हचे युवक प्रशिक्षणातील योगदान एकत्र आणणारे ‘सीड’ केंद्र हे सहकार्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले तसेच उत्पादन क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची फळी तयार करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी शहराची औद्योगिक प्रगती स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण करणारी असावी, असे मत व्यक्त केले. एसकेएफचा ‘सीड’ उपक्रम युवकांच्या भविष्यातील गुंतवणूक असून आर्थिक विकासाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहून उपजीविका घडविता आली, तर समाज आणि देश अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी युवकांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासाला उद्योगांच्या गरजांशी जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘सीड’ केंद्राच्या माध्यमातून नागरी प्रशासन आणि उद्योग यांच्या भागीदारीत प्रशिक्षणापासून रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांतून स्थानिक क्षमता विकसित करून कुशल मनुष्यबळ घडविता येईल आणि देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता राजन यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती गोरे यांनी केले, तर मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.
