पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी 

पिंपरी, दि. ३० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभा नुकतीच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात संपन्न झाली. या सभेमध्ये शहरातील विविध प्रभाग आणि परिसरातील रस्ते विकास, दुरुस्ती, आरोग्य व नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. 

या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: 

रुग्णालय यंत्रणा देखभाल: चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील HVAC, OT आणि विद्युत विषयक यंत्रणेचे पुढील २ वर्षांसाठी चालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. 

सुदर्शननगर हेल्थ क्लब जवळील काम: प्रभाग क्र. १९ मधील सुदर्शननगर हेल्थ क्लब जवळील जुने सी.डी. वर्क पाडून नवीन बांधण्याच्या कामाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. 

रावेत भागातील रस्त्यांचा विकास: प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागात ताब्यात आलेले डी.पी. व नॉन डी.पी. रस्ते विकसित करण्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांची QCBS पद्धतीने नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. 

रस्ते डांबरीकरण (पवनानगर व आदर्शनगर): सन २०२६-२७ करीता प्रभाग क्र. २२ मधील पवनानगर व आदर्शनगर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम करून घेण्यास मंजुरी मिळाली. 

तात्पुरती ध्वनिक्षेपण व प्रकाश व्यवस्था: ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांकरिता तात्पुरत्या स्वरूपाची ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर व प्रकाश व्यवस्था करण्याच्या निविदेला मान्यता दिली. तसेच ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी व थेरगाव उपविभागातील विविध कार्यक्रमांसाठीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. 

आकुर्डी परिसरातील स्थापत्य कामे: प्रभाग क्र. १५ मधील आकुर्डी गावठाण व इतर परिसरात स्ट्रॉर्म वॉटर लाईन, फुटपाथ व इतर स्थापत्य विषयक कामे (नागरिकांचा सहभाग अंतर्गत) करण्यासाठी करारनामा करण्यास मान्यता दिली. 

दफनभूमी काळजीवाहक मुदतवाढ: दापोडी, निगडी आणि दिघी येथील एकूण ५ मुस्लिम व लिंगायत दफनभूमींसाठी नवीन निविदा प्रक्रिया चालू असेपर्यंत, संबंधित धर्मदाय संस्थांना किमान वेतन दरानुसार १ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. 

स्ट्रीट लाईट विद्युत पुरवठा: ‘क’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. २ मधील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे-नाशिक रोड ते सीएनजी पंपपर्यंत रस्ता अद्यावत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, डेकोरेटिव्ह पोल आणि हायमास्ट पोल कार्यान्वित करण्यासाठी म.रा.वि.वि.कं.लि. कंपनीस सुरक्षा ठेव, सर्व्हिस चार्जेस व प्रोसेसिंग फी अदा करण्यास मंजुरी दिली. 

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान: अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या शहर अभियान व्यवस्थापक व समुदाय संघटक या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. 

प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ मधील रिक्षा टेम्पो व्यवस्था: प्रभाग क्र. १६, १७, १८ व २२ मधील कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील ८ महिन्यांसाठी वाहन, इंधन व चालकासह मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

मनपा इमारतींची दुरुस्ती व फर्निचर कामे: प्रभाग क्र. १५ मधील मनपा इमारतींची स्थापत्य विषयक दुरुस्ती, फर्निचर तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. 

वाय. सी. एम. रुग्णालयातील मशीन दुरुस्ती: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) X-ray विभागातील Digital Radiography System मशीनच्या हमी कालावधीनंतर थेट पद्धतीने सिएमसी (CMC) करण्यासाठी मशीनच्या मूळ उत्पादक कंपनीसोबत करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. 

पदपथ उभारणी व रोड फर्निचर कामे: प्रभाग क्र. ९ मध्ये विविध ठिकाणी पदपथ उभारणे आणि नेहरुनगर, विठ्ठलनगर परिसरातील स्थापत्य कामांसाठीची निविदा स्वीकृत करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. १० मधील शाहूनगर भागात रोड फर्निचर विषयक कामांनाही मंजुरी देण्यात आली. 

विविध भागांतील रस्ते आणि नाला दुरुस्ती: प्रभाग क्र. ६ (धावडेवस्ती, गुळवेवस्ती), प्रभाग क्र. ८ (सेक्टर १,२,३,४,६), प्रभाग क्र. २० (विशाल थिएटर, संत तुकारामनगर, कासारवाडी व एमआयडीसी), आणि प्रभाग क्र. ६ मधील नाला दुरुस्ती व स्मशंकरभूमी स्थापत्य कामे अशा विविध प्रभागांतील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्स आणि नाल्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पात्र ठरलेल्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली. 

सार्वजनिक सुविधा व स्वच्छतागृहांची दुरुस्ती: प्रभाग क्र. १५, प्रभाग क्र. ४ (दिघी-बोपखेल), प्रभाग क्र. ३ (चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव) आणि प्रभाग क्र. १८ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि दिशानिर्देश फलक लावणे या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकास: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगवी येथील विद्यार्थ्यांना दृश्याधारित शिक्षण व व्हर्च्युअल प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या ई-लर्निंग मॉड्यूल खर्चाच्या प्रस्तावाचे स्थायी समितीने अवलोकन केले. तसेच महिला आयटीआय कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे तातडीने साहित्य खरेदीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. 

या सर्व विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिल्याने शहरातील नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.