पिंपरी चिंचवडबातम्या

‘आरंभ-साद’ प्रदर्शनाला नागरिकांचा तुडुंब प्रतिसाद; महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळाली हक्काची बाजारपेठ

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना आणि उद्यमशीलतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘आरंभ सोशल फाऊंडेशन’ आणि ‘साद क्रिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आरंभ – साद’ प्रदर्शन मोरवाडी म्हाडा येथील नवीन विरंगुळा केंद्रात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष रंगत आली.

महिला उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका आणि साद क्रिएशनच्या सर्वेसर्वा अर्चना तौदकर यांच्या मातोश्री सुशिला पाटील यांच्या शुभहस्ते झाले. तसेच नगरसेविका सुप्रिया चांदगुडे आणि आरंभ सोशल फाऊंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळीनगरसेविका अनुराधाताई गोरखे , नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे, भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. ऐश्वर्या ताई बाबर  , मा.नगरसेवक नारायण बहिरवडे , सामाजिक कार्यकर्त्या कविताताई खराडे,समृद्धी पाटील, नेहा अहिरे, प्रभा पाटील, पुष्पा बोत्रे, गोफणे मावशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी बी. आर. माडगूळकर, अरविंद देशपांडे, शिर्के मॅडम आणि सुखदेव अंबले सर आदी मान्यवर विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरंभ सोशल फाऊंडेशन आणि साद क्रिएशन यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

दिवाळी सणाच्या तोंडावर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात नागरिकांसाठी खरेदीची पर्वणीच उपलब्ध झाली होती. यामध्ये प्रामुख्याने दिवाळीच्या आकर्षक सजावटीच्या वस्तू, पारंपरिक व फॅशनेबल ज्वेलरी, होम डेकोर आणि घर सजावटीच्या विविध वस्तू तसेच लाईफस्टाईल उत्पादनांचा समावेश होता. स्थानिक महिला उद्योजिकांच्या हाताशी तयार झालेली दर्जेदार उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांचा मोठा उत्साह यामुळे महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महिलांच्या यशस्वी वाटचालीस नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.

या यशस्वी आयोजनाबाबत आपली भूमिका मांडताना आरंभ सोशल फाऊंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांनी सांगितले की, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, यासाठीच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागरिकांनी सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांच्या कलागुणांना दाद दिली आणि मोठ्या प्रमाणावर दिवाळीची खरेदी करत या उपक्रियेला भरघोस प्रतिसाद दिला. स्थानिक उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळवून देणारा हा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत यशस्वी पर्व ठरला आहे.