बातम्या

मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ दुर्घटना प्रकरण : अग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकेश चिपाडे निलंबित

पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील इमारत दुर्घटना प्रकरणात अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणाच्या चौकशीत प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी न करताच अग्निसुरक्षेसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) जारी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही गंभीर निष्काळजीपणा मानून चिपाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मोशी दुर्घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी या प्रकरणात पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनाही निलंबित करण्यात आले होते.

उल्लेखनीय म्हणजे, ८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपोमधील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेने चौकशी सुरू करत संबंधित अधिकाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू केली आहे.