पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करा

खासदार श्रीरंग बारणे यांची  केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहेच. २०११ मध्ये १७ लाख असलेली शहराची लोकसंख्या आजमितीला ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर निवासी विकास, पायाभूत सुविधा, मेट्रो विस्तार आणि औद्योगिक वाढ यामुळे कार्यक्षम सार्वजनिक सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी  केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. शहरात स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करण्याची गरज त्यांना समजावून सांगितली. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, १९७० च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड व परिसरातील गावांमध्ये औद्योगिक वसाहती विकसित केल्यानंतर या भागात वेगाने औद्योगिक आणि नागरी विकास झाला. या परिसराचा नगरपालिका ते १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा प्रवास झाला आणि त्यानंतर हे शहर भारतातील अग्रगण्य औद्योगिक व आर्थिक केंद्र म्हणून विकसित झाले. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, फिनोलेक्स यांसारख्या प्रमुख उद्योगांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि इतर सेवा क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नागरीकरणाला अधिक गती मिळाली. परिणामी, महाराष्ट्रासह देशभरातील रोजगार शोधणाऱ्यांसाठी पिंपरी-चिंचवड हे एक प्रमुख आकर्षणकेंद्र बनले आहे.

२०११ मध्ये सुमारे १७ लाख असलेली शहराची लोकसंख्या आज जवळपास ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर निवासी विकास, पायाभूत सुविधा, मेट्रो विस्तार आणि औद्योगिक वाढ यामुळे कार्यक्षम सार्वजनिक सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची स्वतंत्र प्रशासकीय, औद्योगिक आणि आर्थिक ओळख निर्माण झाली आहे. मात्र, टपाल प्रशासन अद्यापही पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे प्रशासन आणि सेवा वितरणात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे

स्वतंत्र टपाल विभागाची आवश्यकता आहे. लोकसंख्येतील झपाट्याने वाढ, नागरी विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे टपाल सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तक्रार निवारण, दावे, प्रशासकीय कामकाज यासाठी नागरिकांना पुण्यातील  कार्यालयात जावे लागते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील १ मुख्य टपाल कार्यालय, त्याअंतर्गत ३० उपटपाल कार्यालये व ८ शाखा टपाल कार्यालये. एवढ्या विस्तृत कार्यक्षेत्रामुळे प्रशासकीय कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा परिणाम कार्यक्षमता, देखरेख आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत आहे.स्वतंत्र पिंपरी-चिंचवड टपाल विभाग स्थापन झाल्यास दोन्ही शहरांमधील व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि सेवा दर्जात सुधारणा होईल. सध्याच्या पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे विभाजन करून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड टपाल विभाग स्थापन करण्यात यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

स्वतंत्र टपाल विभागाचे फायदे

प्रशासकीय कार्यक्षमता आणि सेवा वितरणात सुधारणा होईल.

नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होईल.

तक्रार निवारण व दाव्यांची पूर्तता अधिक जलद होईल.

टपाल विभागाच्या तसेच केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल.

देखरेख आणि कार्यक्षमतेत वाढ होईल.

कर्मचारी कल्याण व प्रशासकीय निर्णय अधिक जलद घेता येतील.

सुमारे ३४५ चौ. कि.मी. शहरी क्षेत्रातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सेवांचा अधिक प्रभावी लाभ मिळेल.