पिंपरी मतदारसंघातील वीज समस्या १ महिन्याच्या आत सोडवा, आमदार अमित गोरखे यांचा महावितरणला अल्टीमेटम

पिंपरी: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वाढती वीज समस्या आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यावर तात्काळ ठोस उपाययोजना काढण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे २८ जुलै रोजी उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांच्या समस्या मांडत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सक्त निर्देश दिले.
वारंवार वीजपुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त
पिंपरी मतदारसंघातील शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, निगडी प्राधिकरण, मोहननगर, मोरवाडी, विद्यानगर आणि आकुर्डी परिसरातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सलग दोन दिवस वीज नसणे, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीचे काम उशिरा होणे यांसारख्या गंभीर समस्यांचा पाढा नागरिकांनी या बैठकीत वाचला. नागरिकांच्या या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत आमदार अमित गोरखे यांनी अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
१. तक्रार निवारण: प्रत्येक बुधवारी ‘तक्रार निवारण दिन’ पाळण्यात येईल तसेच आगामी २८ ऑगस्टपर्यंत (१ महिन्याचा कालावधी) वीज समस्यांबाबत विशेष आढावा घेऊन प्रलंबित तक्रारींचे प्राधान्याने निवारण केले जाईल.
२. कर्मचारी वाढ: वाढत्या वीज मागणीचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कर्मचारी संख्या वाढविण्यात येईल (यासाठी प्रशासनाला १ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे).
३. नवीन सब-स्टेशन: भविष्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सब-स्टेशन उभारणीच्या प्रक्रियेला गती दिली जाईल.
४. विशेष कक्ष: नागरिकांच्या फोनद्वारे येणाऱ्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक विशेष तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
‘नागरिकांचा त्रास कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. वीज हा मूलभूत प्रश्न असून, सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने तातडीने आपली यंत्रणा सुधारली पाहिजे. यासाठी महावितरण प्रशासनाने एका महिन्याच्या आत विशेष उपाययोजना कराव्यात. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.’ – आमदार अमित गोरखे
वीज पुरवठ्याबाबत काही अडचण, तक्रार किंवा समस्या असल्यास महावितरणच्या (MSEB) नवीन हेल्पलाइन क्रमांकावर जारी करण्यात आले असून समस्या जाणवल्यास संपर्क साधावा.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, नगरसेविका सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक श्री. अमित गावडे, माजी नगरसेवक श्री. राजू दुर्गे, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती श्री. कैलास कुटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष श्री. अनुप मोरे, महावितरणचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या बैठकीनंतर महावितरण प्रशासनाकडून वीज समस्येवर लवकरच सकारात्मक व ठोस कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
