पिंपरी चिंचवडबातम्या

पाण्याचा काटकसरीने वापर करा, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार आता कडक कारवाई

अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या सूचना

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२६: अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आणि आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा तसेच पुढील वर्षी राज्यात पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्व महानगरपालिका आणि इतर संबंधित संस्थांनी पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि काटकसरीच्या वापरासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यक कामांसाठीच

गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांना पिण्याच्या पाण्याऐवजी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) तसेच जीटीपीच्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृतरीत्या पिण्याच्या पाण्याचा नळजोड वापरला जात असल्यास तो तातडीने बंद करण्यात येईल. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. वाहनांची धुलाई, टेरेस आणि अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

नवीन गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येतील. महापालिकेच्या नळजोडाला विद्युत पंप लावून पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधित विद्युत पंप जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याशिवाय वॉशिंग सेंटर आणि इतर मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत.

व्यावसायिकांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी

व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प आणि इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी. घरगुती वापर, शाळा आणि रुग्णालये यांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

जमिनीवरील संपवेल तसेच इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून जाणार नाही किंवा गळती होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. रस्त्यावरील पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांमधून होणारी गळती निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने पाणीपुरवठा विभागाला द्यावी. भूजलपातळीही पुरेशी नसल्याने बोअरवेलच्या पाण्याचा वापरदेखील जपून आणि आवश्यक तेवढाच करावा.

बांधकामासाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर बंधनकारक

बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर न करता महापालिकेच्या एसटीपीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसून ते विहिरीत अथवा टाकीत साठवून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांनी हा प्रकार तातडीने बंद करावा. अशा प्रकारचा अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पाण्याची बचत करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान

पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचवेळी पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकांमार्फत पाहणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची आणि पुढील वर्षाची पाणी सुरक्षितता निश्चित करेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीच्या या प्रयत्नांत महापालिकेला सहकार्य करावे,” असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.