पत्रकारांच्या सेवेला सलाम ! पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाकडून सदस्यांना उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते वितरण ; पावसाळ्यात बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही ऋतूमध्ये जनतेपर्यंत अचूक आणि तत्पर माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. त्यांच्या या कर्तव्याची दखल घेत अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदस्यांना उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले.
यावेळी अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्षा सायलीताई कुलकर्णी तसेच पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी, सभासद आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ हा पत्रकारांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे संघटनेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना बापूसाहेब गोरे म्हणाले, “पत्रकारांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोणतीही सबब न सांगता घटनास्थळी जाऊन बातमीदारी करावी लागते. विशेषतः पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करत काम करावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांना पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून त्यांच्या कार्याला आवश्यक सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, उपाध्यक्ष विनय लोंढे, उपाध्यक्ष रेहान सय्यद, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील कांबळे, सरचिटणीस संतोष जराड, चिटणीस मुकेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख युनूस खतीब, डिजिटल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे,अशोक लोखंडे,अमोल डंबाळे, शबनम सय्यद,विश्वास शिंदे यांच्यासह संघटनेचे अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पत्रकार सदस्यांनी समाधान व्यक्त करत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या पत्रकारहिताच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संघाच्या माध्यमातून भविष्यातही पत्रकार कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
