भक्ती आणि शक्तीचा संगम; पैलवान सवंगड्यांच्या भेटीने आमदार महेश लांडगे भावुक!
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला मल्ल, वस्तादांची उपस्थिती
– गुलशे तालमीतील आठवणींना पैलवानांनी दिला उजाळा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
आखाड्यातील मेहनत, वस्तादांनी दिलेले संस्कार आणि मातीशी जुळलेले नाते जपणारे आमदार महेश लांडगे यांच्यासाठी नवरात्रोत्सवाची चौथी माळ विशेष ठरली. आई अंबाबाईच्या महाआरतीनिमित्त शहरातील ज्येष्ठ मल्ल, मार्गदर्शक वस्ताद आणि पुण्यातील गुलशे तालमीतील पैलवान सवंगडी एकत्र आले. त्यांच्या भेटीने आमदार लांडगे यांच्या कुस्तीच्या प्रवासातील आठवणींना उजाळा मिळाला.
पै. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात चौथ्या माळेनिमित्त महाआरतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी कुस्ती क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. शक्तीची साधना करणाऱ्या पैलवानांच्या देवीभक्तीमुळे सोहळ्यात भक्ती आणि शक्तीचा संगम अनुभवायला मिळाला.

आमदार महेश लांडगे स्वतः पैलवान असल्याने कुस्तीपटू, वस्ताद आणि कुस्ती क्षेत्राशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. पुण्यातील गुलशे तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. याच तालमीतील मित्र आणि मार्गदर्शक महाआरतीसाठी आल्याने आखाड्यातील सराव, मेहनतीचे दिवस आणि वस्तादांच्या मार्गदर्शनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाही तालमीतील सवंगड्यांप्रती त्यांची आपुलकी या भेटीतून अधोरेखित झाली.
**
जुन्या सवंगड्यांचा भावनिक क्षण…
पैलवानांसाठी कुस्ती ही केवळ शारीरिक ताकदीची स्पर्धा नसून शिस्त, संयम, निष्ठा आणि संस्कारांची साधना असते. आमदार लांडगे यांच्या जीवनातही या तालमीतील संस्कारांना विशेष स्थान आहे. त्यामुळे जुन्या सवंगड्यांची ही भेट केवळ औपचारिक भेट न राहता संघर्षाच्या आणि जडणघडणीच्या प्रवासाला उजाळा देणारा भावनिक क्षण ठरली. या भेटीबाबत भावना व्यक्त करताना आमदार लांडगे म्हणाले, “ज्या मातीने मला घडवलं, ज्या तालमीने संस्कार दिले आणि ज्या वस्तादांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्याप्रतीची कृतज्ञता कायम आहे. आज पैलवान मित्र आणि मार्गदर्शकांच्या भेटीने तालमीतील दिवस पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले. ही नाती आणि आठवणी माझ्यासाठी कायम प्रेरणेचा ठेवा आहेत.” देवीच्या आराधनेसोबतच कुस्तीच्या मातीतून जुळलेल्या नात्यांचा स्नेह या सोहळ्यात दिसून आला. आमदार लांडगे यांच्या पैलवानकीच्या प्रवासातील सहकाऱ्यांच्या उपस्थितीने नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला आपुलकीची किनार लाभली.
**
प्रतिक्रिया :
“पैलवान हा भक्ती आणि शक्तीची उपासना करणारा साधक असतो. तालमीच्या मातीने मला ताकद दिली, वस्तादांनी शिस्त शिकवली आणि सवंगड्यांनी आयुष्यभराची साथ दिली. आज आई अंबाबाईच्या आरतीनिमित्त ही जिवाभावाची माणसं भेटली आणि कुस्तीच्या आखाड्यातील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. आयुष्यात जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरी मला घडवणाऱ्या मातीशी आणि कुस्तीच्या परिवाराशी असलेली नाळ कायम जपणार आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
