चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रात भागीदारी करावी – मंत्री जयकुमार रावल
चेक प्रजासत्ताक आणि महाराष्ट्रातील औद्योगिक सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञान व गुंतवणुकीच्या संधींवर भर

चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी केवळ भारतीय बाजारपेठेत उत्पादने विकण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारावेत, गुंतवणूक करावी आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीतून दीर्घकालीन भागीदारी विकसित करावी, असे आवाहन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
‘सीआयआय’च्या वतीने चेक प्रजासत्ताकाचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कारेल हॅवलिक यांच्या उपस्थितीत भारतीय आणि चेक प्रजासत्ताकातील उद्योग प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री रावल बोलत होते.
मंत्री रावल म्हणाले की, चेक प्रजासत्ताकाची अभियांत्रिकी, वाहननिर्मिती, अवकाश उद्योग, आधुनिक यंत्रसामग्री, रोबोटिक्स आणि वैज्ञानिक संशोधनातील क्षमता, तसेच महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता यांची सांगड घातल्यास दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्याला मोठी चालना मिळू शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचे योगदान देणारे राज्य म्हणून पुढे आले आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे ४० टक्के वाटा असून, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या सुमारे ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई हे देशाचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र, पुणे हे वाहननिर्मिती, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र, तर नाशिक हे उत्पादन, अवकाश उद्योग आणि कृषी क्षेत्रातील संधींसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अन्य औद्योगिक केंद्रांमध्येही उत्पादन क्षेत्राचा विस्तार होत आहे. या औद्योगिक क्षमतेचा लाभ चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञान, वाहननिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्याच्या संधी
वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, विद्युत वाहननिर्मिती, अवकाश उद्योगाशी संबंधित उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रातील पुरवठा साखळीच्या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. संशोधन, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उच्च कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देण्यावर राज्याचा भर असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा आणि लेझर तंत्रज्ञानासारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत काम करावे, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले.
मंत्री रावल म्हणाले, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता, कृषी व अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग तंत्रज्ञान, आधुनिक बांधकाम, वास्तुरचना आणि स्मार्ट इमारत उपाययोजना या क्षेत्रांतही सहकार्याची क्षमता आहे. अशा भागीदारीतून उत्पादकता वाढविण्याबरोबरच, मूल्यवर्धनाला चालना देता येईल आणि शेतकरी तसेच उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करणे शक्य होईल. चेक प्रजासत्ताकातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करून स्थानिक पातळीवर उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला हातभार लावावा, असे सांगून भारत-युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करारामुळे भविष्यात आर्थिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा लाभ घेणार – कारेल हॅवलिक
चेक प्रजासत्ताकाचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कारेल हॅवलिक यांनी भारताच्या विकासाचा आणि गेल्या काही दशकांतील प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारताच्या राजकीय, आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक सामर्थ्याचा अभ्यास करण्यासाठी चेक प्रजासत्ताकाचे प्रतिनिधीमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले असून, दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या महत्त्वाच्या केंद्रांमधील भेटींमधून विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
चेक प्रजासत्ताक हा औद्योगिक आणि तांत्रिक क्षमता असलेला देश असून, तेथील विद्यापीठे, संशोधन व विकास व्यवस्था आणि मूल्यवर्धित उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्था ही महत्त्वाची बलस्थाने आहेत. भारत आणि युरोपियन महासंघाच्या मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर दोन अब्जांहून अधिक लोकांच्या बाजारपेठेशी संबंधित व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या संधी विस्तारू शकतात. या पार्श्वभूमीवर भारतासोबत औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्यास चेक प्रजासत्ताक उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांच्या या बैठकीमुळे महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक भागीदारीला चालना मिळण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारत-झेक आर्थिक भागीदारी संयुक्त उत्पादन, सह-विकास, तंत्रज्ञान भागीदारी आणि नवोन्मेषावर आधारित नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था झेक उद्योगांसाठी उपयुक्त असून, झेक प्रजासत्ताक भारतीय कंपन्यांना युरोपीय बाजारपेठा, उत्पादन साखळ्या आणि नवोन्मेष समूहांशी जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरू शकते, असे ‘सीआयआय’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी यांनी नमूद केले. यावेळी विविध उद्योगसमूहांमध्ये परस्पर सामंजस्य करार करण्यात आले.
