पिंपरी चिंचवडबातम्या

अवध राजपूत संघाच्या सामाजिक कार्यासाठी हक्काची जागा द्या!

 भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडे आग्रही मागणी
– हक्काच्या जागेअभावी उपक्रमांच्या आयोजनावर मर्यादा

पिंपरी-चिंचवड ।

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना गती देण्यासाठी योग्य सार्वजनिक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अवध राजपूत विकास संघाने केली आहे. संघाचे अध्यक्ष उमाशंकर सिंह यांनी यासंदर्भात भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले असून, संबंधित प्रशासनामार्फत जागेची पाहणी करून आवश्यक मंजुरीची कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

अवध राजपूत विकास संघाच्या माध्यमातून परिसरातील समाजघटकांच्या हितासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, या उपक्रमांचे नियमित आणि प्रभावी आयोजन करण्यासाठी हक्काची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. रचनात्मक आणि सामाजिक कामांसाठी योग्य सार्वजनिक जागा उपलब्ध नसल्यामुळे संस्थेच्या कार्यावर मर्यादा येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, महिलांच्या सहभागातून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आणि तरुणांना विधायक कार्याशी जोडण्यासाठी योग्य जागेची आवश्यकता आहे. अशी जागा उपलब्ध झाल्यास संस्थेच्या उपक्रमांमध्ये सातत्य राखणे आणि अधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, अशी भूमिका संघाने मांडली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य जागेची पाहणी करण्याचे निर्देश द्यावेत. जागा निश्चित करून ती सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करण्याबाबत आवश्यक मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आमदार महेश लांडगे जनहिताच्या, सामाजिक आणि विकासात्मक कामांना प्राधान्य देतात, असा उल्लेख संघाने निवेदनात केला आहे. सामाजिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात संघाचे अध्यक्ष उमाशंकर सिंह, उपाध्यक्ष राजेंद्र सिंह, कोषाध्यक्ष ओमशंकर सिंह आणि संस्थापक सदस्य राजेश सिंह यांची नावे नमूद आहेत. सामाजिक कार्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून संस्थेच्या विधायक उपक्रमांना बळ द्यावे, असे आवाहन अवध राजपूत विकास संघाने केले आहे.

“ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांसाठी विधायक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना बळ देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अवध राजपूत विकास संघाच्या जागेसंदर्भातील मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करू. योग्य जागेची उपलब्धता आणि आवश्यक प्रशासकीय बाबी तपासून, नियमानुसार प्रस्तावाला गती मिळावी यासाठी पाठपुरावा करू. सामाजिक कार्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी माझे सहकार्य राहील.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड,पुणे.