पिंपरी चिंचवडबातम्या

आमदार महेश लांडगे यांना ‘क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ घोषित

पंढरपूरमध्ये १८ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण
– चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते होणार सन्मान

पिंपरी-चिंचवड / पंढरपूर । प्रतिनिधी

हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांना यंदाचा ‘क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. हिंदुत्वविषयक कार्य आणि गोरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल मंदिराशेजारील क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या पुतळ्याजवळ हा सोहळा होणार असून, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि उपस्थित साधुसंतांच्या हस्ते आमदार लांडगे यांचा गौरव करण्यात येईल. मानाचे महावस्त्र, कुंडलिनी-कृपाणांकित भगवा ध्वज आणि अकरा हजार रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदुत्वविषयक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, बडवे यांनी स्वातंत्र्यलढा, गोवामुक्ती लढा आणि मराठवाडा मुक्ती लढ्यात योगदान दिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, भालजी पेंढारकर, सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांचा सहवास होता. पंढरपूरमधील सामाजिक व तालीम क्षेत्रातील कार्यासोबतच १९५६ च्या महापुरातील बचावकार्यासाठीही त्यांचे स्मरण केले जाते.

आमदार लांडगे यांनी गोरक्षण आणि हिंदुत्वाशी संबंधित विषयांवर सार्वजनिक जीवनात तसेच विधानसभेत घेतलेल्या भूमिकांचा पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न आणि स्मारकाच्या निमित्ताने आयोजित ढोल-ताशा मानवंदना सोहळ्याचाही आयोजकांनी उल्लेख केला आहे.

“क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या नावाने दिला जाणारा ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ घोषित होणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि जबाबदारी वाढविणारा क्षण आहे. राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि हिंदुत्वनिष्ठेचा त्यांचा वारसा प्रेरणादायी आहे. हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गोरक्षण, संस्कृतीचे जतन आणि जनसेवेसाठी अधिक निर्धाराने कार्य करत राहीन. या सन्मानासाठी स्मारक मंडळाचे मनःपूर्वक आभार!”

यापूर्वी मिलिंद एकबोटे, शिवशंकर स्वामी, धनंजय देसाई, अभय वर्तक, संजीव पुनाळेकर, प्रमोद मुतालिक आणि प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांच्यासह विविध मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिवीर वसंतदादा बडवे स्मारक मंडळाचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी-इचगावकर, पत्रकार व माजी नगरसेवक महेश खिस्ते, विवेक बेणारे आणि शहर हिंदू महासभेचे अध्यक्ष विकास मोरे यांनी केले आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.