माय मराठीचा साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज
अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ विषयावर मान्यवरांचे विचारमंथन

पिंपरी : मराठी साहित्याला मोठी परंपरा लाभली आहे. मराठी साहित्यामध्ये आपला इतिहास, संस्कृती, परंपरा, संघर्ष, संवेदना आणि स्वप्ने यांचे प्रतिबिंब दिसते. काळानुसार साहित्याची भाषा आणि स्वरूप बदलले, तरी माणसाचे जीवन, त्याचे प्रश्न आणि भावना हे मराठी साहित्याचे महत्त्वाचे विषय राहिले आहेत, असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ या विषयावर चर्चासत्र झाले. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया, राजन लाखे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे, आणि ज्येष्ठ लेखक प्रा. संजय पवार यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी मराठी साहित्याची परंपरा, त्यातील विविधता आणि बदलत्या काळानुसार साहित्यामध्ये झालेले बदल यांवर चर्चा झाली.
डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, “विविध भाषांच्या संपर्कातून मराठी भाषेत अनेक नवीन शब्द आले आणि त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. काही नाटके आणि कवितांवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव दिसतो. ग्रामीण भागातून आणि उपेक्षित समाजघटकांतून निर्माण झालेले साहित्य हे अलीकडच्या काळातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.”
ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी यादवकालापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंतच्या साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “संतपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे मराठी भाषेला व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक आधार मिळाला. समाजाला जोडण्याचे आणि राष्ट्रभावना जागविण्याचे काम मराठी साहित्याने केले आहे. मराठीच्या विविध बोलीभाषांनाही प्रमाणभाषेइतकेच महत्त्व दिले पाहिजे.”
प्रा. संजय पवार यांनी मराठी साहित्याच्या निर्मितीमागील प्रेरणांविषयी विचार मांडले. ते म्हणाले, ‘लीळाचरित्र’ आणि ‘विवेकसिंधू’ हे मराठी साहित्यपरंपरेतील महत्त्वाचे प्राचीन ग्रंथ आहेत. एकोणिसाव्या शतकानंतर साहित्याचे स्वरूप आणि मांडणी बदलत गेली. मराठी साहित्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.”
ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यांनी मराठीतील गद्य आणि पद्य साहित्यपरंपरेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य गद्यग्रंथ, तर ‘विवेकसिंधू’ हा आद्य पद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. ‘ज्योतिषरत्नमाला’सारख्या रचनांचेही संदर्भ आढळतात. संत, पंत आणि तंत या परंपरांनी मराठी साहित्य समृद्ध केले. वास्तव, अनुभव आणि कल्पना यांच्या आधारे मराठीमध्ये विविध प्रकारचे साहित्य निर्माण झाले.”
ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी नव्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी नव्या पिढीला तिचा इतिहास आणि साहित्याचा प्रवास समजावून सांगणे आवश्यक आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘गाथासप्तशती’ला प्राचीन साहित्यपरंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. सातवाहन राजा हाल यांच्याशी संबंधित असलेल्या या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाथासंग्रहातून त्या काळातील जीवन आणि लोकभावना समजतात.”
चर्चासत्राचा समन्वय राजेंद्र घावटे यांनी साधला. किशोर केदारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आभार मानले.
