चिखलीत पाच अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

पिंपरी : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार फ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे १२०० चौरस मीटर बांधकामाचे निष्कासन करण्यात आले.
ही कारवाई फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईसाठी सहा अतिक्रमण पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर तसेच १० कंत्राटी मजूर तैनात करण्यात आले होते. अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी दोन ट्रॅक्टर ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू असून, नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
