अभिजात मराठी भाषा सप्ताहात रंगली मराठी लोककला, बालरंगभूमी आणि संगीताची सुरेल मैफल
‘मराठी लावण्यां’पासून ‘स्वरशांता’पर्यंत आणि शाहिरी पोवाड्यापासून बालनाट्यापर्यंत विविध कलाविष्कारांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, लोककला, संगीत आणि रंगभूमीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना मिळत आहे. मराठी लावणी, बालनाट्य, शांता शेळके यांच्या गीतांचा सुरेल आविष्कार आणि शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध कलारूपांचा अनुभव नागरिकांना मिळाला. या सर्व कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांसाठी खास ‘मराठी लावण्यां’चा ठसकेबाज आविष्कार
सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात महिलांसाठी खास ‘मराठी लावण्यांचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिला कलाकारांनी महिला रसिकांसमोर सादर केलेल्या या कार्यक्रमात लावणीतील ठसका, नजाकत, अभिनय, नृत्य आणि ताल यांचा मनोहारी आविष्कार अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देतानाच महिला रसिकांनीही लावणीच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गण, मुजरा आणि गवळण यांच्या सादरीकरणाने झाली. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माया खुटेगांवकर यांनी ‘विचार काय हाय तुमचा ओ पाव्हणं’ या लावणीद्वारे दमदार अदाकारी सादर केली. दोन बालगंधर्व पुरस्कार तसेच विठाबाई भाऊमांग पुरस्काराने सन्मानित अर्चना जावळेकर यांनी ‘या रावजी बसा भावजी’ या लोकप्रिय लावणीच्या माध्यमातून अभिनय, नृत्य आणि अदाकारीचा सुरेख मिलाफ घडविला.
नमिता पाटील यांनी ‘आजकाल पाटलांचा लय रुबाब बाई लय रुबाब’, प्राची मुंबईकर यांनी ‘कुण्या गावचं आलं पाखरू’, तर पूजा विडकर आणि अस्मिता पुणेकर यांनी ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या लावण्यांचे सादरीकरण केले. यानंतर लोकगीते आणि मराठी चित्रपट गीतांचाही कार्यक्रमात समावेश करण्यात आला. गायक स्वप्नील गायकवाड यांनी ‘पाटलांचा बैलगाडा’ हे गीत सादर केले.
महिला कलाकारांच्या कलाविष्कारातून मराठी भाषेचा गोडवा, महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे वैभव आणि स्त्री कलावंतांच्या कलागुणांचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमातून घडला. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक समीर सूर्यवंशी, तर स्मिता देशमुख आणि वैजयंती भालेराव यांनी नियोजक म्हणून जबाबदारी सांभाळली. निवेदन राम दत्तकला यांनी केले.
‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ने बालरंगभूमीचा अनुभव
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आचार्य अत्रे रंगमंच येथे ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विनोदी प्रसंग, गाणी, नृत्य आणि कल्पनारम्य कथानकामुळे विद्यार्थ्यांनी बालनाट्याला उत्स्फूर्त दाद दिली. ग्रीझी अस्वल आणि चिंटू या व्यक्तिरेखांभोवती गुंफलेल्या प्रसंगांनी विद्यार्थ्यांचे विशेष मनोरंजन केले.
रंगीत नेपथ्य, आकर्षक वेशभूषा आणि प्रकाशयोजनेमुळे नाटकाचे कल्पनाविश्व अधिक प्रभावी झाले. मनोरंजनासोबतच समूहाने नाटक पाहण्याचा आणि मराठी रंगभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.
‘कादंबरी प्रोडक्शन हाऊस’ गेल्या चार दशकांपासून बालनाट्य क्षेत्रात कार्यरत असून, चिंचवड येथे १९८७ मध्ये संस्थेची स्थापना झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत. “आजच्या कम्प्युटर आणि मोबाईलच्या युगात मुलांचे हरवलेले बालपण पुन्हा अनुभवायला मिळावे, यासाठी बालनाट्याच्या माध्यमातून त्यांना कल्पनारम्य विश्वात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारांना चालना मिळावी, याचे समाधान आहे,” असे संस्थेचे प्रमुख प्रा. नितीन कुमार यांनी सांगितले.
शांता शेळकेंच्या शब्दांना सुरांची साथ; ‘स्वरशांता’ची भावस्पर्शी मैफल
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे कवयित्री शांता शेळके यांच्या अजरामर गीतांवर आधारित ‘स्वरशांता’ हा संगीत कार्यक्रम संपन्न झाला. मंजुश्री दिवाण यांच्या संकल्पनेतून आणि सादरीकरणातून साकारलेल्या या कार्यक्रमातून शांता शेळके यांच्या शब्दप्रतिभेला सुरांचा साज चढविण्यात आला. शुभदा दामले आणि विशाखा कुलकर्णी यांनी ओघवते सूत्रसंचालन केले.
‘गणराज रंगी नाचतो’ या मंगलमय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘जय शारदे’, ‘ही वाट दूर जाते’, ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’, ‘घनराणी’, ‘हे श्याम सुंदर’, ‘पुनवेचा चंद्रमा आला घरी’, ‘वादळ वारं सुटलं’, ‘काटा रुते कुणाला’, ‘शालू हिरवा’, ‘माजे राणी माजे मोगा’, ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू’, ‘शारदा सुंदर चंदेरी राती’ आणि ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ अशा विविध गीतांच्या सादरीकरणातून शांता शेळके यांच्या गीतलेखनाचा विविधांगी आविष्कार रसिकांसमोर आला.
बालगीतांपासून चित्रपटगीतांपर्यंत, भावगीतांपासून कोळीगीतांपर्यंत आणि नाट्यगीतांपासून कोकणी गीतांपर्यंत शांता शेळके यांनी आपल्या लेखणीतून निर्माण केलेल्या शब्दवैभवाचा अनुभव या कार्यक्रमातून मिळाला. मंजुश्री दिवाण यांच्या शिष्यांनी स्पष्ट शब्दोच्चार, भावपूर्ण गायन आणि गीताच्या भावविश्वाशी एकरूप होणाऱ्या सादरीकरणातून प्रत्येक गीताला स्वतंत्र रंग दिला.
‘स्वरशांता’ हा केवळ गीतांचा कार्यक्रम न राहता शांता शेळके यांच्या शब्दांच्या अंगणात फेरफटका मारणारा आणि मराठीच्या अभिजात सौंदर्याचा पुनःप्रत्यय देणारा भावस्पर्शी प्रवास ठरला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘जागर मराठीचा… गजर शाहिरीचा’मधून इतिहास आणि लोककलेचा जागर
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या सहकार्याने ‘शाहिरी पोवाडा, जागर मराठीचा… गजर शाहिरीचा’ हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या मातीतील संत, शूरवीर आणि महापुरुषांच्या पराक्रमाचा इतिहास शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर जिवंत करण्यात आला. एकूण १५ पारंपरिक आणि स्फूर्तीदायक रचनांचा सलग प्रवाह यावेळी सादर करण्यात आला.
पारंपरिक गण आणि शिवरायांच्या चरणी अर्पण केलेल्या मुजऱ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, शिवजन्म आणि स्वराज्यनिर्मितीचा संघर्ष उलगडणारे शिवजन्मपूर्व आणि शिवजन्म पोवाडे सादर करण्यात आले. पारंपरिक वासुदेवाच्या सादरीकरणातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. ‘महाराष्ट्र कुलस्वामिनी’ या जोगव्याच्या माध्यमातून भक्तिभावाचा आविष्कार झाला.
‘चमके शिवशाही तलवार’, ‘शिवबाचे मावळे’ आणि ‘छत्रपती शिवरायांचा विचार जयजयकार’ या सादरीकरणांतून स्वराज्य, मावळ्यांचा त्याग आणि शिवरायांच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित करण्यात आली. त्यानंतर वीर बाजीप्रभूंच्या पराक्रमावर आधारित पोवाडा, सुंदर धनगरी गीत, संयुक्त महाराष्ट्र गोंधळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ही लावणी सादर करण्यात आली.
अखंड महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या विशेष महाराष्ट्र पोवाड्याने आणि राष्ट्रभक्तीचा जयजयकार करणाऱ्या ‘गर्ज हे हिंद भूमी’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शाहीर प्रकाश ढवळे, शाहीर बाळासाहेब माळुसकर, शाहीर चैतन्य आजरुडकर, शाहीर रामरत्न पाडगळ, शाहीर अभिजित काळोखे, शाहीर ऋषिकेश मिनिकराव, शाहीर मनिषा मोहिते, शाहीर स्मिता बोरीवकर, शाहीर कांचन शास्त्री, शाहीर चित्रा कुलकर्णी, शाहीर अभय मोरे, शाहीर आरिफा पठाण आणि शाहीर अनिकेत सोनकांबळे यांनी खणखणीत आवाज आणि दमदार सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. बाळशाहीर अथर्व गायकवाड याच्या बालवयातील उत्कृष्ट सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
अभिजात मराठी भाषा सप्ताहातील या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा केवळ साहित्यिक नव्हे, तर लोककला, संगीत, नाट्य आणि शाहिरी परंपरेशी असलेला समृद्ध अनुबंध रसिकांसमोर आला. विविध वयोगटातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मराठीच्या अभिजात परंपरेचा प्रत्यक्ष कलानुभव देणारे हे कार्यक्रम सप्ताहाच्या उद्देशाला अधिक व्यापक स्वरूप देणारे ठरले.
