‘मंगलगाणी – दंगलगाणी’ ने मराठी संस्कृतीला स्पर्श करीत रसिकांची जिंकली मने!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी संस्कृतीचा सुरेल जागर

पिंपरी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : संतवाणीतील भक्तिरसाची अनुभूती… शाहिरी आणि पोवाड्यांतून जागणारा पराक्रमाचा हुंकार… लावणीच्या ठेक्यावर थिरकणारी पावले… लोकपरंपरेतील गोंधळ, भारूड, ओव्या आणि गवळणींतून उलगडणारे मराठमोळे जीवन… अशा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा सुरेल, तालबद्ध आणि बहुरंगी आविष्कार ‘मंगलगाणी – दंगलगाणी’ या कार्यक्रमातून
अनुभवायला मिळाला. भक्तीपासून शौर्यापर्यंत, लोककलेपासून नाट्यसंगीतापर्यंत आणि जुन्या अजरामर गीतांपासून ठसकेबाज लावणीपर्यंतच्या या संगीतमय प्रवासाने पिंपरी चिंचवडकर रसिकांना मंत्रमुग्ध करीत मराठी बाण्याची जाणीव पुन्हा एकदा जागवली.
अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मराठी वाद्यवृंदाच्या इतिहासात वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता आणि लोकप्रियता मिळविलेल्या ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या ‘चौरंग’निर्मित तसेच सुप्रसिद्ध कलाकार अशोक हांडे दिग्दर्शित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘पसायदान’पासून ते पु. ल. देशपांडे यांच्या ‘कसाईदाना’पर्यंतचा मराठी गाणी, संगीत आणि संस्कृतीचा संगीतमय इतिहास या कार्यक्रमातून उलगडण्यात आला. मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा हा बहारदार कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरला.
अभंग, शाहिरी, काव्य, पोवाडे, लावणी, गवळण, नाट्यसंगीत, भावसंगीत, सुगमसंगीत आणि चित्रपटगीते अशा महाराष्ट्राच्या समृद्ध सांगीतिक ठेव्याचा अनुभव रसिकांना मिळाला.
….
नृत्य, नाट्य, चित्रफीत, गाणी आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ
‘मोगरा फुलला’ या सुरेल गीताने
कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘पसायदान’, ‘खेळ मांडियेला’, ‘रात्र काळी’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या गीतांतून भक्तिरस आणि अध्यात्माचा स्वर अधिक गहिरा झाला. ‘सूर्य उगवला प्रकाश पडला, ‘आडवा डोंगर’ या भारुडातून लोककलेचा बाज अनुभवायला मिळाला, तर ‘विठ्ठल माझा भाऊ गं’ या जात्यावरील ओवीने ग्रामीण जीवनातील परंपरा आणि भावविश्व उलगडले. ‘घनश्याम सुंदरा, अरुणोदय झाला’ या गीताने पहाटेच्या प्रसन्न वातावरणाची अनुभूती दिली. ‘रानात सुरू झालीय पेरण’ या शेतकरी गीतातून काळ्या मातीशी असलेले नाते आणि श्रमसंस्कृतीचे दर्शन घडले.
‘काठी अन् घोंगडं घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की’ या लोकगीताने ग्रामीण जीवनातील उत्साह आणि जत्रेचा आनंद जागवला. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ या गीताने शौर्याची भावना चेतवली. ‘दार उघड’ या गोंधळातून महाराष्ट्राच्या लोकधार्मिक परंपरेचा आविष्कार झाला.
कोकणातील दशावतार परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘पहिलं नमन’ या सादरीकरणासह त्यानंतर झालेल्या ढोलकी वादनाने कार्यक्रमात तालाचा नवा रंग भरला. त्यानंतर सादर झालेल्या लावणी, सण-उत्सवाची गाण्यांनी महाराष्ट्राच्या लोकजीवनातील उत्साह खुलविला. कोळीगीतांच्या सादरीकरणातून सागरी किनारपट्टीवरील जीवनशैलीचा स्पर्श झाला, तर ‘सागरा प्राण तळमळला’ या गीतातून स्वातंत्र्याची तळमळ आणि देशप्रेमाची भावना व्यक्त झाली.
नाट्यसंगीताच्या भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘रात्रीचा समय सरुनी’ या गीतानंतर ‘शुक्रतारा मंद वारा’ आणि ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या गीतांनी प्रेमभावना आणि सुरेल संगीताचा अनुभव दिला. ‘लटपट लटपट तुझं चालणं’, ‘बाई मी विकत घेतला शाम’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘ऐरणीच्या देवा’ आणि ‘बैल तुझे हरणावणी’ यांसारख्या गीतांनी विविध संगीतप्रकारांची रंगत वाढवली. विविध बोली, प्रादेशिक संगीतपरंपरा, लोककला आणि लोकप्रिय मराठी गीतांचा हा सुरेल प्रवास रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती देणारा ठरला. या कार्यक्रमाने मनोरंजनासोबतच मराठी भाषेची गोडी, लोककलेचे महत्त्व आणि सांस्कृतिक परंपरांचे मोल अधोरेखित केले.
……
स्वराज्याचा जागर; घोषणांनी दणाणले प्रेक्षागृह
‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशावेळी ‘हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा’ या विचाराने स्वराज्याची प्रेरणा जागविण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी प्रेक्षागृह दणाणून गेले. त्यानंतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि ‘प्रभो शिवाजी राजा’ या गीतांतून शिवचरित्र, शौर्य आणि मराठी अस्मितेचा जोशपूर्ण आविष्कार सादर करण्यात आला.
……
सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी होणारे विविध कार्यक्रम
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
- सकाळी ९ वा. – एकांकिका ‘सोळाशे पन्नास’
- सकाळी १० वा. – एकांकिका ‘नंतर कधीतरी’
- दुपारी १२ वा. – संतोष पवार लिखित-दिग्दर्शित विनोदी मराठी नाटक – ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ (कलाकार : सागर कारंडे, शलाका पवार, सायली देशमुख)
- सायंकाळी ५.३० वा. – सचिन खेडेकर अभिनीत, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेले नाटक ‘भूमिका’
- रात्री ९.३० वा. – सणांवर आधारित संगीत-नृत्यमय कार्यक्रम ‘सणयात्रा’ (लोकजागर ॲक्टिव्हिटीज)
….
चिखली टाऊन हॉल, चिखली - सकाळी ९ वा. – बालनाट्य ‘ग्रीझीच्या गुहेत चिंटूची धमाल’
- सायंकाळी ५ वा. – अभंग व भक्तीगीतांचा गजर ‘अभंगवारी’ (ज्ञानेश्वर मेश्राम, कल्याणी देशपांडे आणि सहकारी)
….
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी - सकाळी ११ वा. – नाट्य-संगीतमय आविष्कार ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’
- सायंकाळी ६.३० वा. – ‘रंग भक्तीचे.. सूर लोकगीताचे’ (चंद्रकांत शिंदे, संकल्प गोळे, राजेश्वरी पवार)
…..
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
- सकाळी १० वा. – अभिवाचन
- दुपारी १२ वा. – परिसंवाद (विषय : ‘अभिजात मराठी भाषेचा प्रवास’)
- दुपारी ३ वा. – कथाकथन
- सायंकाळी ५ वा. – गझल मुशायरा
- सायंकाळी ७ वा. – गझलगायन (अनिरुद्ध यादव)
