पनवेल महापालिकेसाठी स्वतंत्र ‘अतिरिक्त जिल्हा निबंधक’ नियुक्त करा
खासदार श्रीरंग बारणे यांची भारताच्या महानिबंधकांकडे मागणी

पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि जन्म-मृत्यू नोंदणीच्या कामात होणारा विलंब टाळण्यासाठी, पनवेल महापालिका क्षेत्राकरिता स्वतंत्र ‘अतिरिक्त जिल्हा निबंधक’ म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भारताच्या महानिबंधकांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयाला सविस्तर पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या सध्या अंदाजे १० लाखांच्या घरात पोहोचली आहे. महापालिका हद्दीत सुमारे २२९ रुग्णालये कार्यरत असून, चार प्रशासकीय प्रभागांमधून जन्म व मृत्यू नोंदणीसंदर्भातील हजारो अर्ज नियमितपणे प्राप्त होत असतात. सध्या नागरिकांकडून जुन्या जन्म-मृत्यू नोंदी मिळविण्यासाठी तसेच विलंबाने होणाऱ्या नोंदींसाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. नियमांनुसार, या अर्जाची ‘सीआरएस’ पोर्टलवर नोंदणी करून अतिरिक्त जिल्हा निबंधक यांची मंजुरी घेणे बंधनकारक असते. मात्र, सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जन्म व मृत्यू नोंदणीच्या अर्जाची छाननी व मंजुरीची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर असल्यामुळे मंजुरी प्रक्रियेला मोठा विलंब होत आहे. परिणामी, विविध शासकीय, प्रशासकीय आणि कायदेशीर कामांसाठी हे दाखले अत्यावश्यक असलेल्या सामान्य नागरिकांना विनाकारण मनस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पनवेल क्षेत्राचा वाढता आवाका आणि कामाचा प्रचंड ताण लक्षात घेता, पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पनवेल क्षेत्रासाठी अतिरिक्त जिल्हा निबंधक (जन्म व मृत्यू) म्हणून स्वतंत्र नियुक्ती करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे. ही नियुक्ती झाल्यास कागदपत्रे व दाखले मंजुरीची प्रक्रिया अत्यंत जलद होईल आणि नागरिकांना वेळेत आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
