पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध कल्याणकारी प्रस्तावांना मंजुरी….
पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य..

*पिंपरी, दि. १८ नोव्हेंबर २०२६ :’- * पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली.या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित पायाभूत सुविधा, रस्ते विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करून विविध विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सभेत मान्यता दिली.
पायाभूत सुविधा व रस्ते विकासकामे
शहरातील विविध प्रभागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती, पावसाळी गटारांची साफसफाई, नालेसफाई, अंतर्गत रस्ते, पदपथ आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली. चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, मोशी, डुडुळगाव, दिघी-बोपखेल, भोसरी, बुर्डेवस्ती, पठारे मळा, जाधववाडी, कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी, विनायकनगर आदी परिसरांतील विकासकामांचा यात समावेश आहे.
तसेच दिघी-आळंदी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर, सबवे व उड्डाणपूल, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल आणि नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावरील विविध स्ट्रक्चर्सच्या रेलिंग, पर्जन्यजल वाहिन्या व इतर स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. रस्ते दुभाजकांची देखभाल व सुशोभीकरण करण्याच्या कामासही मान्यता देण्यात आली.
मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारणी
पवना थेट जलवाहिनी, ड्रेनेज मास्टर प्लॅन टप्पा-१, डीएमए स्थापना व नॉन-रेव्हेन्यू वॉटर प्रकल्प, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन टप्पा-२ आणि मोशी हॉस्पिटल प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड व इतर वित्तीय स्रोतांद्वारे निधी उभारणी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यासाठी स्वतंत्र निधी उभारणी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्यासही मंजुरी देण्यात आली.
स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधांना प्राधान्य
विविध प्रभागांतील नालेसफाई, गटारांची साफसफाई, अतिक्रमण निष्कासन, आरोग्यविषयक कामे आणि सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई तसेच नेहरूनगर येथील नवीन न्यायालय परिसरातील स्वच्छतेसाठी कर्मचारी पुरविण्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध विभागांसाठी कॉटरी मशीन खरेदी, रुग्णालयातील रंगरंगोटी आणि भोसरी रुग्णालयातील स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
महिला सक्षमीकरण व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण
महिला सक्षमीकरण व सबलीकरण योजनेंतर्गत शहरातील महिला व मुलींना वस्तीपातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५७ विविध विषयांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. यामध्ये अकाउंट्स, फॅशन डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्युटी व वेलनेस, फूड प्रोसेसिंग, माहिती तंत्रज्ञान, डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, केटरिंग तसेच पारंपरिक कला आणि सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
तसेच झोपडपट्ट्यांमधील सेवाशुल्क बिलांचे वाटप आणि नागरिकांची माहिती मोबाईल ॲपद्वारे अद्ययावत करण्याचे काम महिला बचतगटांमार्फत करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे महिला बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, एनएमएमएस, नवोदय परीक्षा सराव पुस्तके तसेच उर्दू व हिंदी माध्यमाच्या स्वाध्याय पुस्तिका खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इयत्ता पाचवी व नववीतील इच्छुक विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने सूर्यनमस्कार आणि भगवद्गीता प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमासही मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या १०५ शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात एक हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे नियोजन आहे.
ग्रंथालये, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम
शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर येथील सार्वजनिक ग्रंथालये ज्येष्ठ नागरिक संघ व महिला बचतगटांमार्फत चालविण्याच्या करारास ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पिंपरी व पिंपरीगाव येथे आयोजित महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्व २०२६ तसेच महानगरपालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पेस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या प्रयोग कला महोत्सवासाठी अंदाजित २४ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानातील भव्य राष्ट्रध्वज फडकविणे, त्याचे संचलन व देखभाल तसेच संबंधित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामासही मान्यता देण्यात आली.
अन्य महत्त्वपूर्ण निर्णय
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० च्या अंमलबजावणीसाठी सल्लागार एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. चिखली येथील मंजूर विकास योजनेतील वाहनतळ, सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी आरक्षित जागा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख क्र. २ पुणे (उत्तर) कार्यालयास ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली.
सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती व वेतन पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागात दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली.
याशिवाय पवना थेट पाइपलाइन प्रकल्पाच्या लवाद प्रकरणात महापालिकेची बाजू मांडण्यासाठी नियुक्त वरिष्ठ विधिज्ञांच्या कामकाजास आणि क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भोजन व अल्पोपहार पुरवठ्याच्या कामास मुदतवाढ देण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
शहरातील विकासकामांना गती देतानाच नागरिकांना मूलभूत सुविधा, महिलांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या विविध प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली.
आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांचा सत्कार…
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेची निवड झाल्याबद्दल स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे हस्ते आयुक्त डाॅ.विजयजी सुर्यवंशी साहेब यांचा स्थायी समिती सभेत सत्कार करण्यात आला यावेळी स्थायी समिती सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम ,तृप्ती सांडभोर,विक्रांत बगाडे आणि उप आयुक्त डाॅ.प्रदीप जंगम उपस्थित होते.
