Sunday, October 4, 2026
Latest:
बातम्यामहाराष्ट्र

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण

मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरज

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध कोशांमध्ये लाखो मराठी शब्द नोंदविले गेले असून, ही शब्दसंपदा मराठीच्या समृद्ध भाषिक परंपरेचे दर्शन घडवते, असे त्यांनी सांगितले. मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मराठी AI’च्या माध्यमातून नव्या युगाशी नाते

डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील ज्ञानसामग्री उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बोलीभाषांचा गोडवाही जपला पाहिजे

प्रमाण मराठीसोबतच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य ठेवा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी, झाडीबोली यांसारख्या बोलीभाषांमध्ये स्थानिक संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनानुभव सामावलेले आहेत. त्यामुळे या बोलींचे साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठी नाट्यसंस्कृतीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. आधुनिक तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असतानाही अनेक पिढ्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवली. कलावंतांनी आपल्या अभिनयातून, लेखनातून आणि प्रयोगशीलतेतून मराठी रंगभूमीला वेगळी ओळख मिळवून दिली. ही नाट्यपरंपरा मराठीच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे वैशिष्ट्य असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

रोजच्या व्यवहारातून मराठीचे संवर्धन

मराठीचे जतन आणि संवर्धन केवळ शासकीय उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारातून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर वाढला पाहिजे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला भविष्यातील सक्षम ज्ञानभाषा बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपली माय मराठी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर आपला स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या समृद्ध परंपरेने नटलेली मराठी आता सातासमुद्रापार पोहोचली असून, जगभरात तिचा डंका वाजत आहे. भविष्यातही मराठीचा जागतिक विस्तार अधिक वेगाने व्हावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. डिजिटल जगत, सोशल मीडिया, पॉडकास्ट, गेमिंग आणि कोडिंगसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढवून नव्या पिढीला मराठीशी जोडले पाहिजे. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लंडनमध्ये सुमारे ७० ते ८० हजार मराठी बांधव वास्तव्यास असून, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मराठीचे शिक्षण, अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र परीक्षांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याच्या दिशेनेही काम सुरू असून, महाराष्ट्र मंडळाची वास्तू खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी वाढदिवस, सत्कार किंवा अन्य आनंदाच्या प्रसंगी पुष्पगुच्छ देण्याऐवजी मराठी पुस्तके भेट देण्याची नवी संस्कृती रुजवावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. मराठी भाषा धोरण, ‘पुस्तकांचे गाव’, ‘कवितेचे गाव’ यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे काम सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लंडनमध्ये ‘मराठी वैश्विक केंद्र’, १०० बोलीभाषांचे कोश – उदय सामंत

मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी वैश्विक केंद्र’, राज्यातील विविध बोलीभाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी ‘मराठी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

परदेशातील मराठी बांधवांशी संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ देशांमध्ये ‘नमो संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, परदेशातील मराठी बांधवांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येत आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. आंतरराष्ट्रीय मराठी मंचांची संख्या सध्या ५२ वर पोहोचली असून, ती लवकरच ७५ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून जगभरातील मराठी भाषकांमध्ये संवादाचे जाळे अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्यिकांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत राज्य सरकारकडून ‘साहित्य संग्रहालय’ आणि अत्याधुनिक ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठी साहित्याचा वारसा जतन करणे, साहित्यिकांच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण करणे आणि नागरिकांना मराठी साहित्य-संस्कृतीशी जोडणारी आधुनिक केंद्रे निर्माण करणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. ऐरोली येथील उपकेंद्र तसेच ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘कवितेचे गाव’ यांसारखे उपक्रमही प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभिजात मराठीच्या संशोधनासोबत डिजिटायझेशनवर भर; तरुणांनी मराठीच्या समृद्ध प्रवासात सक्रिय सहभागी व्हावे

– सचिव किरण कुलकर्णी

मराठी भाषेचा प्रवाह केवळ ज्ञानेश्वर महाराज किंवा चक्रधर स्वामी यांच्या काळापासून सुरू झालेला नसून, सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘गाथा सप्तशती’पासून तिची समृद्ध परंपरा पुढे आलेली आहे. या प्रदीर्घ भाषिक वारशाचे संशोधन, जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संक्रमण करण्यासाठी मराठी भाषा विभाग कटिबद्ध आहे, असे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तिच्या अभिजाततेचा अर्थ, भाषिक परंपरा आणि ज्ञानसंपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यंदा विशेषतः युवकांना केंद्रस्थानी ठेवून मराठीचा प्रसार आणि संवर्धनावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विश्वकोश निर्मितीच्या कार्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. विश्वकोशातील ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वेगाने सुरू असून, या महिन्यापासून विश्वकोशाचे काम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. यावेळी ‘मराठीचे कौतुक भाग–२’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.