औंध क्षेत्रीय कार्यालयात ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली सामान्य नागरिकांची उघड्याडोळ्यांनी आर्थिक लूट; आप युवा आघाडीचे ऋषिकेश कानवटे आक्रमक, मोफत पार्किंगची जोरदार मागणी!

पुणे:पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये दररोज शेकडो सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध तक्रारी मांडण्यासाठी, दाखले मिळवण्यासाठी तसेच प्रशासकीय कामांसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी स्वतःचे प्रश्न मांडायला येणाऱ्या सामान्य नागरिकांना पार्किंगच्या नावाखाली आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यांच्याकडून ‘पे अँड पार्क’च्या माध्यमातून जबरदस्तीने पैसे उकळले जात आहेत. या गंभीर बाबीविरोधात आम आदमी पार्टी युवा आघाडीचे ऋषिकेश कानवटे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाने ही लूट तत्काळ थांबवून नागरिकांसाठी मोफत पार्किंग उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
याबाबत बोलताना ऋषिकेश कानवटे यांनी सांगितले की, “महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सहजासहजी सुटत नाहीत, त्या कामांसाठी त्यांना प्रशासकीय कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या हक्काच्या कामासाठी आणि तक्रारी मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणे हे अत्यंत अन्यायाकारक आणि संतापजनक आहे.”
क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी मोफत पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मग ज्या सामान्य नागरिकांच्या करातून महापालिका चालते आणि अधिकाऱ्यांचे पगार होतात, त्याच नागरिकांवर हा भुर्दंड का लादला जात आहे? असा थेट सवाल ऋषिकेश कानवटे यांनी उपस्थित केला आहे.
आम आदमी पार्टी युवा
आघाडीच्या प्रमुख मागण्या:
१. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात शासकीय व प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी तात्काळ ‘मोफत पार्किंग व्यवस्था’ अमलात आणावी.
२. ठेकेदाराच्या नियमांत सुधारणा करून तक्रारदार व अभ्यागतांना पार्किंग शुल्कातून पूर्ण सूट देण्यात यावी.
३. सरकारी इमारती ही ‘नागरी सेवा केंद्र’ असून ती व्यवसायाचे ठिकाण बनवू नयेत.
प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन ‘पे अँड पार्क’ धोरण रद्द न केल्यास आणि नागरिकांना मोफत पार्किंग उपलब्ध करून न दिल्यास, आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने औंध क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ऋषिकेश कानवटे यांनी दिला आहे.
