दि सेवा विकास पतसंस्थेच्या वार्षिक सभेत ६३ हजारांहून अधिक ठेवीदारांना रक्कम परत
उर्वरित ठेवीदारांनी KYC व वारस नोंद पूर्ण करण्याचे प्रशासक डी. एन. काळे यांचे आवाहन; संदीप वाघेरे यांच्या सहकार्याबद्दल विशेष गौरवोद्गार

पिंपरी प्रतिनिधी : पूर्वीची दि सेवा विकास सहकारी बँक लि., पिंपरी-पुणे (अवसायनात) व सध्याची दि सेवा विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन हॉल येथे उत्साहात पार पडली. संस्थेचे प्रशासक मा. डी. एन. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस सभासद, ठेवीदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी प्रशासक डी. एन. काळे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून संस्थेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा सादर केला. एकूण ६३,२५९ ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या १९२ ठेवीदारांची प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी काही ठेवीदारांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तर काही ठेवीदार मयत असून त्यांच्या वारसांची नोंद झालेली नाही. संबंधित ठेवीदारांच्या नातेवाईकांनी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक KYC व वारस नोंद प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासक डी. एन. काळे यांनी केले.
संदीप वाघेरे यांच्या सहकार्याचा प्रशासकांकडून विशेष उल्लेख
यावेळी प्रशासक डी. एन. काळे यांनी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. बँकेच्या अडचणीच्या काळात तसेच ठेवीदार व सभासदांच्या प्रश्नांबाबत संदीप वाघेरे यांनी संस्थेला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले असून, विविध स्तरांवर आवश्यक ते सहकार्य व पाठबळ दिल्यामुळे अनेक कामांना गती मिळण्यास मदत झाली, असे काळे यांनी सांगितले.
“संदीप वाघेरे यांनी संस्थेच्या अडचणीच्या काळात सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवली. ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी संस्थेला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे प्रशासक डी. एन. काळे यांनी नमूद केले.
वैधानिक लेखापरीक्षण अहवालास मान्यता
सभेमध्ये पूर्वीची दि सेवा विकास सहकारी बँक लि., पिंपरी-पुणे (अवसायनात) यांच्या दि. १ एप्रिल २०२५ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीतील तसेच दि सेवा विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांच्या दि. ४ डिसेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षण अहवालास मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्यासही सभेने मंजुरी दिली.
कर्मचाऱ्यांच्या नुकसानभरपाईपैकी १० कोटींहून अधिक रक्कम अदा
बँकेच्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून रु. १३,२०,४७,४५८/- इतकी रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी रु. १०,९७,४०,२०६.५०/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप नुकसानभरपाईची रक्कम घेतलेली नाही, त्यांनी आवश्यक अर्ज व KYC कागदपत्रे संस्थेत जमा करून आपली रक्कम प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन प्रशासक डी. एन. काळे यांनी केले.
नव्या पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास; ५१ लाखांच्या ठेवींची घोषणा
सभेदरम्यान प्रशासक डी. एन. काळे यांनी नवीन पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवणे, बचत खाती उघडणे आणि सभासदत्व घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. विविध सभासदांनी मिळून रु. ५१ लाखांच्या ठेवी ठेवण्याचे मान्य करत संस्थेवरील विश्वास व्यक्त केला.
संदीप वाघेरे : “ठेवीदारांचा विश्वास पुन्हा निर्माण होणे महत्त्वाचे”
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सभासद व ठेवीदारांनी सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहन केले. “अनेक ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या कष्टाची पुंजी या संस्थेशी जोडलेली आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत पारदर्शक पद्धतीने कामकाज पुढे नेणे आवश्यक आहे. मोठ्या संख्येने ठेवीदारांना रक्कम परत मिळाली असून उर्वरित प्रकरणांमध्येही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. नव्या पतसंस्थेवर सभासदांनी दाखविलेला विश्वास ही सकारात्मक बाब असून हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले.
शेवटी प्रशासक डी. एन. काळे यांनी उपस्थित सभासद, ठेवीदार व मान्यवरांचे आभार मानून सभेची सांगता केली.
यावेळी प्रशासक डी. एन. काळे,नगरसेवक संदीप वाघेरे, सामाजिक कार्यकर्ते हरी कटारिया, शेखर अहिरराव, विजय कोटवाणी, प्रकाश मसंद,राजेश रामनाणी प्रवीण ढमाळ,बाळासाहेब रोकडे,प्रवीण वडमारे,वीरेंद्र यादव यांच्यासह सभासद व ठेवीदार, महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
