पिंपरी चिंचवडबातम्या

सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न 

३,५०० हून अधिक सफाई सेवकांची करण्यात आली तपासणी 

पिंपरी, दि. ३० सप्टेंबर २०२६ : शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिरांमध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील आतापर्यंत ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरांमध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आदींची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे, आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगीकारणे आणि आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याबाबतही सफाई सेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. 

“सफाई सेवक हे शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे घटक आहेत. कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य ती काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपाययोजना करता येतात. त्यामुळे सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले. 

कचरा वेचकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डॉ. ठेंगल यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.  

शिबिराच्या माध्यमातून समाज विकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनांचीही माहिती देण्यात आली. महिला बचतगट, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण तसेच महिलांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देऊन पात्र महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

“महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा या योजनांचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणास मदत होईल,” असेही डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी नमूद केले. 

या शिबिरास डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शंकर मोसलगी, डॉ. कुलभूषण कुलकर्णी, डॉ. तुषार जाधव, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, कांचनकुमार इंदलकर, योगेश फल्ले तसेच आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई सेवक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहा. आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांनी मानले.