‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या शीर्षकातून महाराष्ट्राचे नाव वगळा!
आम आदमी पार्टी युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द तातडीने वगळण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चित्रपट महामंडळाकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मागणीची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नावाने चित्रपटाची निर्मिती सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर आम आदमी पार्टीने या शीर्षकावर आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे नाव एखाद्या गुन्हेगारी व लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणाच्या शीर्षकाशी जोडणे अयोग्य असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने चित्रपटाची निर्मिती होत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, अशा संवेदनशील विषयाला ‘महाराष्ट्र’ हे नाव जोडल्याने राज्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठा दुखावली जात असल्याची भूमिका आम आदमी पार्टीने मांडली आहे.
महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, शूरवीर आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असून समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा या राज्याला लाभली आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना राज्याच्या अस्मितेचा आणि कोट्यवधी मराठी नागरिकांच्या स्वाभिमानाचा विचार करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी रविराज काळे यांनी केली आहे. अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
