बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी; मुख्यमंत्र्यांचा पिंपरी महापालिका आयुक्तांना आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवरील आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवरील आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला. याप्रकरणी आयुक्तांनी तत्काळ संबंधित कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी, बांधकाम विभागातील सह शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधित अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम परवानगी विभागात कार्यरत आहेत. अधिकारांचा गैरवापर करून ते नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दाखल होणाऱ्या नस्तीमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी, उणिवा व त्रुटी काढल्या जातात. मंजुरीच्या प्रक्रियेला विलंब केला जातो. विकास प्रकल्पांतील जागांचा मूळ नकाशा किंवा रस्ता बदलणे, मंजूर आरक्षणाचे कारण पुढे करणे, तसेच कागदपत्रांमध्ये नाहक कायदेशीर अडथळे निर्माण करून मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार नगरसेवक हिंगे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर आयुक्तांनी एका अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहर अभियंता, मुख्य अभियंत्यांच्या कामकाजाचे फेरवाटप; कोणाकडे कोणते विभाग ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगीसह पाच विभाग आणि मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे महत्त्वाच्या स्थापत्य विभागासह जलवाहिनीच्या प्रकल्पांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिला.
शहर अभियंतापदी सेठिया यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले आहे. दुसरे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे पर्यावरणसह अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कामकाजाचे फेरवाटप केले आहे. शहर अभियंता सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, शहरी दळणवळण, जलनिस्सारण आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे विभाग सोपवण्यात आले आहेत. त्याचबरोबर तळवडेतील जैवविविधता उद्यान, संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी चौकातील माता रमाई सृष्टी आणि प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान या विशेष प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्य अभियंता ओंभासे यांच्याकडे महत्वाच्या स्थापत्यसह स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा आणि पर्यावरण अभियांत्रिकी हे विभाग सोपविले आहेत. त्याचबरोबर भामा आसखेड, आंद्रा पाणी योजना, पवना बंदिस्त जलवाहिनी, निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र हे प्रकल्पही सोपवण्यात आले आहेत. सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडून जलनिस्सारण विभाग काढला असून, त्यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे. सह शहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे जलनिस्सारण विभाग कायम ठेवून पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांना पदोन्नती देऊन सहशहर अभियंता म्हणून स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बदली
‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे यांची भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून बदली केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. संतोष कोराड यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
अनुरेखक निलंबित
शिक्षिकेशी गैरवर्तन करणाऱ्या अनुरेखकाला निलंबित करण्यात आले आहे. मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीमार्फत त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
