पिंपळे निलख येथे नदीपात्रात शेकडो मासे मृत; दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: ‘आप’चे रविराज काळे

पिंपरी-चिंचवड:पिंपळे निलख येथील इंगवले चौक परिसरातील नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. भर पावसाळ्यात नदीपात्रात दूषित आणि रसायनयुक्त पाणी सोडून जलचरांचा बळी घेणाऱ्या बेजबाबदार घटकांचा शोध प्रशासन कधी घेणार, असा अत्यंत संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष
रविराज काळे यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्याचे दिवस असताना नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठा असतो, अशा परिस्थितीतही इतक्या मोठ्या संख्येने मासे मृत पावून पाण्यावर तरंगताना दिसणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. परिसरातील काही बेकायदेशीर कारखाने, व्यावसायिक अथवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून (STP) प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त विषारी पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा दाट संशय आहे. या दूषित पाण्यामुळे नदीतील प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण झपाट्याने घटले असून, यामुळेच या निष्पाप जलचरांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
या गंभीर प्रकारामुळे केवळ जलचरांचेच नुकसान झालेले नाही, तर संपूर्ण इंगवले चौक व नदीकाठच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच प्रदूषणकर्त्यांचे धाडस वाढले असल्याचा आरोप रविराज काळे यांनी केला आहे.
प्रमुख मागण्या:
तात्काळ पाण्याचे नमुने घ्यावेत: महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नदीच्या दूषित पाण्याचे नमुने तात्काळ प्रयोगशाळेत तपासावेत.
दोषींवर गुन्हे दाखल करावेत: नदीत विषारी रसायने आणि प्रक्रिया न केलेले पाणी सोडणाऱ्या संबंधित कारखानदार आणि दोषी घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई व गुन्हे दाखल करावेत.
मृत माशांची विल्हेवाट: परिसरात रोगराई पसरू नये यासाठी नदीपात्रात साचलेल्या मृत माशांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ सुरक्षित विल्हेवाट लावावी.
सीसीटीव्ही व देखरेख पथक: नदीपात्रात गुपचूप दूषित पाणी सोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासावेत आणि विशेष गस्ती पथक तैनात करावे.
”नद्या आपल्या जीवनवाहिन्या आहेत, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे शहरातल्या नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये होत आहे. जर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि दोषींवर त्वरित कडक कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका भवनावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा रविराज काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
