Saturday, October 17, 2026
Latest:
पुणेबातम्या

पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार; भरती रद्द करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी, तर रोहित पवारांनी दिला ‘हा’ मोठा इशारा

भरती परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती परीक्षेत कथित गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. या भरती प्रतिक्रियेत ३ उमेदवार संशयित आढळले असून त्यांनी हायटेक पद्धतीने परीक्षेत कॉपी केल्याचं उघड झालं आहे. या प्रकारामुळे या तीनही उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. या उमेदवारांना मदत करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी आणि तीन उमेदवार अशा पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता महापालिकेने १६९ पदांपैकी १४६ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्तांकडून देण्यात आली आहे. मात्र, या भरती परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच रोहित पवार यांनी थेट ‘मनपा’समोर आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. मात्र, तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटलं?
“पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी ‘मनपा’समोर आंदोलन केलं, त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता आयबीपीएसच्या अहवालात पुढील चौकशीची गरज (merit further investigation) असा स्पष्ट निष्कर्ष असताना, तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झाली? यामागे कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
“हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्याबरोबर ‘मनपा’समोर आंदोलनाला बसावं लागेल”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.