भोसरी एमआयडीसीमध्ये राष्ट्रीय लघुउद्योग दिन उत्साहात संपन्न; महिलांना लेझर कटिंग मशीनचे प्रात्यक्षिक

पिंपरी-चिंचवड : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी एमआयडीसीमधील मेहेक इंडस्ट्रीज येथे राष्ट्रीय लघुउद्योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महिलांना आधुनिक उद्योग क्षेत्रातील विविध संधींची माहिती देण्यात आली. मेहेक इंडस्ट्रीज येथे महिलांसाठी लेझर कटिंग मशीनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. मशीनचा वापर, उत्पादन प्रक्रिया, तांत्रिक वैशिष्ट्ये तसेच त्याद्वारे निर्माण होणाऱ्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली.

महिला लघुउद्योग संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचे उद्योग सुरू केले पाहिजेत. महिला केवळ रोजगार मागणाऱ्या नव्हे, तर इतरांना रोजगार देणाऱ्या सक्षम उद्योजिका बनल्या पाहिजेत. प्रत्येक महिलेला कौशल्य, प्रत्येक कौशल्याला उद्योग आणि प्रत्येक उद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”
पुढील काळात दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष उद्योग विभागातर्फे महिलांना मेहेक इंडस्ट्रीज येथे लेझर कटिंग मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे दुर्गा भोर यांनी सांगितले. या उपक्रमातून महिलांसाठी नवीन स्टार्टअप निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय नियोजन, शासकीय योजनांची माहिती तसेच उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, “महिला उद्योजकांना आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ आणि योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या उद्योग क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवू शकतात. महिलांच्या कौशल्याला उद्योगाची जोड देऊन नवीन उद्योजिका आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
महिला उद्योजकांना अर्थसाहाय्य मिळविताना येणाऱ्या अडचणी, बाजारपेठेचा अभाव, तांत्रिक प्रशिक्षणाची कमतरता, उद्योगासाठी जागा, परवाने, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाने महिला उद्योजकांसाठी कमी व्याजदरात कर्ज, शासकीय योजनांचे सुलभ मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, सुरक्षित औद्योगिक परिसर आणि स्वतंत्र महिला औद्योगिक क्लस्टर उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमातून “प्रत्येक महिलेला कौशल्य, प्रत्येक कौशल्याला उद्योग, प्रत्येक उद्योगाला बाजारपेठ आणि प्रत्येक महिला उद्योजिकेला सन्मान” हा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या उद्योग आघाडी अध्यक्षा रेश्मा मुल्ला, जयश्री साळुंखे, रमाताई बनसोडे, रूपाली तोतरे, पूनम कोळपकर, पायल मानकर, अवंतिका भोर, माही शेख, वैष्णवी पांचाळ, सोमेश डहाळे, गणेश भुजबळ, निरंजन मनवर, आकाश बनसोडे आणि शुभम सरोज यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“महिला सक्षम तर उद्योग सक्षम, उद्योग सक्षम तर महाराष्ट्र सक्षम आणि महाराष्ट्र सक्षम तर देश सक्षम,” असा संदेश देत सर्व लघुउद्योजक आणि कर्तृत्ववान महिला उद्योजकांना राष्ट्रीय लघुउद्योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
