पुणेबातम्या

ग्रामीण भागातही ‘आवाजाला’ बांध; डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा पोलिसांचा इशारा

वर्गणीतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन; अमली पदार्थविरोधी मोहिमेत सहभागाची पोलिसांची विनंती.

पुणे : ‘गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील ‘प्लाझ्मा साउंड’ आणि प्रखर लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी शनिवारी दिला.पुणे जिल्ह्यातील विविध भागांत ५,३०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील प्रमुख १५० मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाषाण रस्त्यावरील मुख्यालयात शनिवारी आयोजित केली. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, पोलीस अधीक्षक गिल यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाले, ‘बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. ध्वनिक्षेपकांचा वापर करावा. मात्र, डेसिबल मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. मर्यादा ओलांडल्यास पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील समस्या मांडल्या.’

‘उत्सवाच्या कालावधीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी आनंद आणि उत्साहात उत्सव साजरा करावा. मात्र, नियमावलीचे उल्लंघन करू नये. उत्सवाच्या काळात ग्रामीण भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांविरुद्द कारवाई करण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
‘नसरापूर, तसेच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात घडलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. कार्यकर्त्यांनी वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून गावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. उत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीवर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल, तसेच गैरप्रकारांना आळा बसेल,’ अशा सूचना गिल यांनी दिल्या.

अमली पदार्थविरोधी माेहिमेत सहभागाचे आवाहन
‘उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हायला हवे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये अमली पदार्थविरोधी जागरुकता निर्माण करण्यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भित्तीचित्रे, फलक लावावेत. ‘से नो टू ड्रग्ज’ या मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जागरुकता निर्माण करावी,’ असे आवाहन संदीपसिंग गिल यांनी केले.