पिंपरी चिंचवडबातम्या

प्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा

स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना

पिंपरी दि. २६ ऑगस्ट २०२६: पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण परिसरात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण तसेच विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या केवळ कागदोपत्री न पाहता त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी परिसरातील स्थानिक व्यापारी, रहिवासी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, दैनंदिन नागरी सुविधा तसेच इतर विविध समस्यांकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची माहिती घेत संबंधित बाबींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला.

नागरिकांच्या तक्रारी व अडचणींची दखल घेत उपमहापौर बाबर यांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. परिसरातील स्वच्छतेशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, नियमित स्वच्छता राखावी आणि नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

तसेच परिसरातील अतिक्रमणाच्या बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. रस्ते, सार्वजनिक जागा आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरातील परिसरामध्ये अतिक्रमणामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आले.

या पाहणीवेळी प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष हेमंत मिश्रा, नंदकुमार पाचपोर, चंद्रकांत बोडके, संग्राम साळुंखे, पवन सूर्यवंशी, कमलेश जैन, रितपाल सिंह तसेच सिंधूनगर येथील रहिवासी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वच्छता, अतिक्रमण, रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रशासनाच्या सहकार्याने प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्यासाठी काम केले जाईल.

  • शर्मिला राजेंद्र बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महापालिका