पिंपरी चिंचवडबातम्या

स्वच्छतेच्या दुर्गा सांभाळताहेत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेची धुरा 

स्वच्छतेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महिला आरोग्य निरीक्षक , आरोग्य मुकादम यांची महत्त्वपूर्ण भूमिका 

पिंपरी दि. १३ ऑक्टोबर २०२६: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची नियमित स्वच्छता होणे आवश्यक असते. ही स्वच्छता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सफाई सेवकांचे नियोजन, कामावर देखरेख आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम या सांभाळत आहेत. स्नेहल सोनवणे, संतोषी कदम, स्नेहा चांदणे, स्नेहल सुकटे, कोमल फर्डे, रश्मी तुंडलवार, रूपाली साळवे, महिला आरोग्य मुकादम प्रमिला शिंदे, शिवगंगा नागरगोजे, रुक्मिणी बिनवडे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 

शहरातील विविध भागांतील स्वच्छता कामांचे नियोजन करणे, सफाई कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे आणि कामकाजावर लक्ष ठेवणे, अशा जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. स्वच्छतेविषयक उपक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांना सातत्याने प्रयत्न करावे लागतात. दैनंदिन कामकाजातून शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास त्यांचे योगदान मिळत आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रयत्न: 

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे याला महत्त्व आहे. या कामात महिला आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम, सफाई सेवकांच्या मदतीने विविध स्वच्छता उपक्रम राबवतात. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन होण्यासाठी प्रयत्न करणे, यावरही भर दिला जातो. 

‘माझी वसुंधरा’ अभियानालाही हातभार 

स्वच्छतेसोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या उद्दिष्टांशी सुसंगत पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन देणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, या प्रयत्नांत आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना महिला आरोग्य निरीक्षक तसेच, आरोग्य मुकादम कामातून हातभार लागतो. 

शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत या महिला निरीक्षक, आरोग्य मुकादम आपली जबाबदारी पार पाडत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नांत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या या महिला खऱ्या अर्थाने ‘स्वच्छतेच्या दुर्गा’ ठरत आहेत. 

शहराची स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन, त्यांच्या कामावर नियमित देखरेख आणि नागरिकांशी समन्वय साधणे आवश्यक असते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासोबतच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी स्वच्छतेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला, तर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. 

-स्नेहल सोनवणे,  

आरोग्य निरीक्षक  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  

शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, त्यासाठी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण देखरेख आणि नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहभागातून पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविणे हेच आमचे ध्येय आहे. 

-कोमल फर्डे, 

आरोग्य निरीक्षक 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका