कवी राजन लाखे यांना इंदूर येथील वसंत राशिनकर स्मृती अखिल भारतीय सन्मान २०२५ जाहीर

पिंपरी : ज्येष्ठ कवी आणि गझलकार राजन लाखे यांना इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘कविवर्य वसंत राशिनकर स्मृती अखिल भारतीय सन्मान २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील आपले वाचनालय या संस्थेचे सचिव संदीप राशिनकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, परीक्षक समितीने यावर्षी राजन लाखे यांच्या ‘गझलायन’ या गझलसंग्रहाची उत्कृष्ट मराठी काव्यकृती म्हणून निवड केली आहे. यापूर्वी रविचंद्र हडसनकर, दासू वैद्य, गीतेश गजानन शिंदे, संजय चौधरी, डाॅ. विशाल इंगोले, राजू देसले, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, प्रताप वाघमारे तसेच प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर या प्रथितयश कवींच्या साहित्यकृतींना वसंत राशिनकर अखिल भारतीय स्मृती सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
यावर्षी अंजली मराठे – बडोदा (‘सृजना’), मोहन काळे – नवी मुंबई (‘अखेर मी माझीच समजूत घातली’), रामचंद्र किल्लेदार – ग्वाल्हेर (‘भाव मनातले… कविता मनातल्या’), बाळासाहेब नागरगोजे – बीड (‘युद्ध पेटले आहे’), नंदू मुलमुले – नांदेड (‘अनंगवाणी’), स्वप्निल चाफेकर ‘प्रीत’ – पालघर (‘लेखणीने मेघ होता’) आणि इंदूर येथील स्मिता सराफ (‘सांजवात… माझ्या मनात’) या काव्यसंग्रहांना ‘वसंत राशिनकर स्मृती काव्यसाधना अखिल भारतीय सन्मान २०२५’ प्रदान करून संस्थेचे अध्यक्ष मिलिंद दिघे, प्रमुख पाहुणे डाॅ. विकास दवे, विशेष अतिथी अश्विन खरे, व्याख्याते सदाशिव कौतुक यांच्या उपस्थितीत आपले वाचनालय, राजेंद्रनगर, इंदूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
‘बकुळगंध’कार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या राजन लाखे यांना विविध मान्यताप्राप्त संस्थांच्या साहित्य पुरस्कारांनी यापूर्वी गौरविण्यात आले आहे.
