पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली आगळीवेगळी ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पिंपरी-चिंचवडमध्ये

महानगरपालिकेच्या ‘प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना स्मरून भव्य मॅरेथॉनचे आयोजन!

पिंपरी-चिंचवड, ३० जुलै २०२६ : साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी व लोकजागृतीच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच युवकांमध्ये आरोग्य, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, याच उद्देशाने मा. आमदार श्री. अमित गोरखे यांच्या मुख्य संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली आगळीवेगळी ‘साहित्यरत्न दौड २०२६’ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आगळीवेगळी ‘साहित्यरत्न दौड’
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पिंपरी-चिंचवड प्रबोधन पर्व २०२६’ या साप्ताहिकाअंतर्गत विविध कार्यक्रम होत असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ही भव्य ‘साहित्यरत्न दौड’ आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा उपक्रम २ ऑगस्ट रोजी पार पडत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: सामाजिक परिवर्तनाचे पर्व
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे अभिमानास्पद साहित्यरत्न, लोकशाहीर आणि सामाजिक परिवर्तचे प्रणेते होते. त्यांनी आपल्या अजरामर साहित्य, शाहिरी आणि क्रांतिकारी कार्यातून वंचित, शोषित, कष्टकरी व बहुजन समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाची प्रखर प्रेरणा दिली. त्यांचे विचार आजही संपूर्ण बहुजन समाजासाठी दीपमाळ ठरले आहेत. त्यांच्या याच वैचारिक वारशाला अभिवादन करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने आयोजित ही दौड केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि युवकांच्या सहभागाचा एक मोठा संदेश देणारा सामाजिक उत्सव आहे.

कार्यक्रमाची सविस्तर माहिती
दिनांक: २ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ५:०० ते १०:०० वा.
स्थळ: बर्ड व्हॅली उद्यान, नोव्हेल चौक, चिंचवड, पिंपरी-चिंचवड.
प्रस्तावित मार्ग: बर्ड व्हॅली उद्यान चौक (नोव्हर चौक) निगडी-भोसरी रोड → केएसबी चौक → पिंपरी-चिखली रोडकडे उजवे वळण → पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त निवासस्थान → लाल बहादूर शास्त्री मार्ग (बीआरटी) कडे उजवे वळण → कालेवाडी बीआरटी कॉरिडोअर → मदर तेरेसा उड्डाणपूल → पवना नदी पूल → जोतिबा गार्डन, पवनानगर बस स्टॉप (येथून यु-टर्न) → याच बीआरटी मार्गाने माघारी → समाप्ती: बर्ड व्हॅली उद्यान चौक.

इतिहास घडवण्यासाठी…
युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित हा महाराष्ट्रातील पहिलाच आगळावेगळा उपक्रम आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा व सांस्कृतिक चळवळीत इतिहास घडवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, माता-भगिनींनी आणि युवकांनी या भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मा. आमदार श्री. अमित गोरखे यांनी केले आहे.