पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नयेत
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी

पिंपरी, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नागरिक, कंत्राटदार (ठेकेदार) अथवा कोणत्याही संस्थांकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारू नयेत, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. याबाबत त्यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिक, कंत्राटदार अथवा कोणत्याही संस्थांकडून भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी (भेटवस्तू) स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये. तसेच, या कलमातील टिप-२ नुसार शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याचे टाळावे, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील कलम १२ या नियमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार अथवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांकडून भेटवस्तू (Gifts) किंवा देणग्या स्वीकारू नयेत. किंवा त्यांच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी किंवा भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. तसेच, सुरक्षा विभागानेदेखील महापालिकेच्या कार्यालयात भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून मज्जाव करावा. अशा प्रकारच्या देणग्या किंवा भेटवस्तू महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
