पिंपरी चिंचवडबातम्या

चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली जीवितहानी 

टेरेसवर अडकलेल्या सुमारे १५ नागरिकांची करण्यात आली सुखरूप सुटका 

पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर २०२६: चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवार (दि.२९) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.  

यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी टेरेसवर अडकलेल्या सुमारे १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. यामध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व काही रुग्णांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या तत्पर बचाव कार्यामुळे येथे कोणतीही जीवितहानी होण्यापासून टळली. सदर घटनेदरम्यान जखमी झालेल्या एका व्यक्तीला तात्काळ तालेरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रासह प्राधिकरण, थेरगाव आणि नेहरूनगर अग्निशमन केंद्रांमधून एकूण ४ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कार्यवाही केली.  

या आगीदरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १७ दुचाकी, २ चारचाकी वाहने, एक सायकल तसेच काही वायरिंग साहित्याचे जळून नुकसान झाले. घटनेदरम्यान टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे अग्निशमन दलासमोरील महत्त्वाचे आव्हान होते. जवानांनी तत्परतेने बचावकार्य करत संबंधित नागरिकांची सुखरूप सुटका केली. 

अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी व तातडीने अग्निशमन दलाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. फोनवर घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी. आग लागलेल्या ठिकाणी गर्दी करू नये आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.