बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही MPSC विद्यार्थी आक्रमक; राज्यभर आंदोलनाचा इशारा, परीक्षार्थींचं नेमकं म्हणणं काय?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सोमवारी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली.

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि शिक्षकांची आक्रमक भूमिका कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे सांगत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असले, तरी केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे. अमरावतीनंतर आता नागपूर मध्ये हे मोठे आंदोलन होणार आहे.

बैठकीत काय ठरले?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सोमवारी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे तसेच विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी MPSC परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, पेपरफुटीबाबत उपलब्ध माहिती आणि पुरावे तसेच विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

‘उच्चस्तरीय समितीचे स्वागत, मात्र ठोस कृती हवी’
परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अन्य संबंधित घटकांशी संवाद साधून परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि सुधारणा याबाबत सूचना घेणार आहे.मात्र, समिती स्थापन करणे हा प्रश्न सोडविण्याचा केवळ पहिला टप्पा असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळबद्ध निर्णय होणे आवश्यक आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
औषध निरीक्षक परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणात अटकसत्रही झाले आहे. आयोगाने संबंधित परीक्षा रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोर्चानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, सोमवारी होणाऱ्या मोर्चात पेपरफुटीबाबत आणखी माहिती किंवा पुरावे समोर आल्यास ते पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचेशिक्षक-विद्यार्थी प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अमरावतीसह राज्यातील विविध भागांत पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘लढेंगे और जितेंगे’
असा निर्धार व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आता राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून पुढील कृती काय होते, याकडे MPSC परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.