पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उप महापौर शर्मिला बाबर यांनी केले.

मतदार यादीतील नोंदी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांचा पत्ता बदल, नावातील दुरुस्ती किंवा अपूर्ण माहिती असल्यास ती अद्ययावत करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

याबाबत बोलताना उप महापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “लोकशाही व्यवस्थेत मतदार यादीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत योग्य पद्धतीने नोंदले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी बीएलओ घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करत आहेत. नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून देत सहकार्य करावे.”

“नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व पात्र मतदारांची नोंद मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करावी. माहितीमध्ये काही बदल असल्यास तातडीने बीएलओंशी संपर्क साधून गणना अर्ज भरावा. नागरिकांच्या सहकार्यामुळे अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार होण्यास मदत होईल,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या सुधारित वेळापत्रकानुसार २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सर्व पात्र मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.