पुणेबातम्या

पुणे शहरातील ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रणाली ?

शहरात दर वर्षी तीन हजार टनांहून अधिक ई-कचरा तयार होतो. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाते.

पुणे : शहरात तयार होणाऱ्या ई-कचरा संकलनासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.

शहरात दर वर्षी तीन हजार टनांहून अधिक ई-कचरा तयार होतो. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाते. यामध्ये मोबाइल, संगणक, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिन यांसह विविध उपकरणांचा समावेश असतो. नवीन वस्तू घरात आल्यानंतर जुन्या झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू थेट कचऱ्यात टाकून दिल्या जातात. त्यामुळे सणांच्या काळात ई-कचऱ्याचे प्रमाण अधिकच वाढते.

ई-कचरा गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे नियमित गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये ई-कचरा एकत्र झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्यास त्याचा पर्यावरणासह मानवी आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ठरावीक कालावधीत ‘व्ही-कलेक्ट ड्राइव्ह’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये नागरिकांकडून जुने बंद पडलेले मोबाइल, टीव्ही, चार्जर, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, फ्रिज यापासून वॉशिंग मशीन, एसी, कूलर, हेडफोन, स्पीकर, कॅमेरा, स्मार्टवॉच, राउटर, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा केल्या जातात. गोळा केलेल्या या वस्तू प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वैध परवाना घेतलेल्या अधिकृत रिसायकलरकडे पुढील प्रक्रियेसाठी सोपविल्या जातात. मात्र, ही मोहीम नियमित स्वरूपाची नसल्याने नागरिकांना ई-कचरा नेमका कुठे आणि कसा द्यायचा, हा प्रश्न पडतो.

दिवसेंदिवस वाढत असलेला ई-कचरा आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्यास निर्माण होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन महापालिकेने यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रस्ताव मागविण्याचा विचार महापालिकेने सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ई-कचरा गोळा करण्यासाठी आवश्यक संकलन केंद्र उभारणे, वाहतूक व्यवस्था आणि अधिकृत पुनर्वापर यंत्रणा उभारणे, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ई-कचरा धोकादायक
ई-कचऱ्यामध्ये शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम यांसारखे घातक घटक आढळतात. हा कचरा नियमित कचऱ्यात मिसळला गेल्यास प्रक्रियेदरम्यान हे घातक घटक पर्यावरणात मिसळण्याची शक्यता असते. ई-कचरा जाळल्यास विषारी धूर आणि घातक वायू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हवा, पाणी, माती यांचे प्रदूषण होण्याबरोबरच मानव, प्राणी आणि वनस्पतींसाठीही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.