पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजय मुंडे!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. या सभेत संचालक मंडळातून संस्थेच्या चेअरमनपदी विजय संभाजी मुंडे, व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत संपतराव भोईर, सेक्रेटरीपदी भास्कर मारुती फडतरे तर खजिनदारपदी विश्वनाथ जगन्नाथ लांडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-३ गजेंद्र एल. सवाईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा संस्थेचे विद्यमान संचालक शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा कारभार सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून विनम्र, तत्पर आणि पारदर्शक पद्धतीने चालविण्याचा संकल्प केला. सभासदांमध्ये बचतीची सवय वाढावी, यासाठी ठेवींवर जास्तीत जास्त ९ टक्के व्याजदर, तर कन्यादान ठेवींवर १० ते १०.५० टक्के व्याजदर देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. तसेच सभासदांना कमीत कमी ११ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करून त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना सांगण्यात आले की, सुमारे १७ वर्षांपूर्वी संस्थेची वार्षिक उलाढाल जवळपास १७ कोटी रुपये होती. आज संस्थेची वार्षिक उलाढाल २०४ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. सभासदांच्या कर्जाची कमाल मर्यादा ५० हजार रुपयांवरून वाढवत २० लाख रुपये करण्यात आली असून, संस्थेची कर्ज थकबाकी केवळ ०.६० टक्के असल्याचे सांगण्यात आले.
या आर्थिक कामगिरीच्या आधारे संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त होत आहे. संस्थेच्या स्थापनेपासून सलग ५४ वर्षे नफा मिळविण्यात संस्थेला यश आले असून, या नफ्यातून सभासदांना वेळोवेळी १२ ते १३ टक्क्यांपर्यंत लाभांश देण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संस्थेच्या माध्यमातून सभासद आणि सेवानिवृत्त सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सलग २५ वर्षे सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षीस म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे. तसेच मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था म्हणून संस्थेचा उल्लेख करण्यात आला.
संस्थेची आर्थिक उलाढाल आणखी वाढविणे, सभासदांना अधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे, कर्जपुरवठा सुलभ करणे आणि सभासदांच्या अडचणी तत्परतेने सोडविणे, या उद्देशाने नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने एकमताने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी शिवाजी येळवंडे, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वनाथ लांडगे, अभिषेक फुगे, सन्नी कदम, नथामातेरे, विजय नलावडे, अनिल लखन, विजया कांबळे, संदीप कापसे, कृष्णा पारगे, योगेश रानवडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनूस पगडीवाले यांच्यासह संस्थेचे सल्लागार दिगंबर चिंचवडे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, लाला गाडे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर, तुषार कसपटेल, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, मदन चिंचवडे, भाऊसाहेब शेलार, किशोर आठवल, गौतम पायाळ, गौतम भालेराव, राकेश चव्हाण, रमेश लोंढे, सुधीर वायदंडे, धनंजय जाधव, सुनील कुदळे, हनुमंत चाकणकर तसेच विविध प्रभागांतील संघटनेचे पदाधिकारी आणि महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतीला आणि सभासदाभिमुख कारभाराला आणखी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
