पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

डॉ. डी. वाय. पाटील ‘आधुनिक काळातील ज्ञानदेव’; देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवली – आमदार अमित गोरखे

दादांनी उभा केलेला ज्ञानाचा विशाल वटवृक्ष काळाच्या पलीकडे; येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या स्वप्नांना सावली, दिशा आणि बळ देत राहील…  

पिंपरी चिंचवड, 13 ऑगस्ट 2026  : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अखंड मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश दिला; त्याच परंपरेतील डॉ. ज्ञानेश्वर यशवंत  पाटील हे आधुनिक काळातील दुसरे ज्ञानदेव होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवेचा दीप प्रज्वलित करून महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञानाची गंगा पोहोचवली. शिक्षणमहर्षी, समाजसेवक आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवेच्या माध्यमातून उभे केलेले कार्य हे केवळ संस्थांचे जाळे नसून ज्ञानाचा विशाल वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या सावलीत असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार झाली असून, त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना मिळत राहील, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. 12 ऑगस्ट रोजी नेवाळे वस्ती येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुलात आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. या सभेचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील संकुल, नेवाळे वस्तीचे संस्थापक बी. डी. कोटकर व अभय कोटकर यांच्या वतीने करण्यात आले होते.  

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व
आमदार गोरखे म्हणाले, काही माणसे देहाने आपल्यातून निघून जातात; मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रवास कधीच थांबत नाही. डॉ. डी. वाय. पाटील हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी एका संस्थेपासून सुरू केलेला प्रवास आज शेकडो शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आहे. शिक्षणाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी होती. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी संधींची दारे खुली केली. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ मिळाले, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञानाची ज्योत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली
डॉ. पाटील यांच्या साधेपणा आणि माणुसकीचा उल्लेख करताना आमदार गोरखे म्हणाले, मोठेपणा पदात नसतो, तो माणसे जोडण्यात असतो. राज्यपालपदासारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचूनही त्यांनी सामान्य माणसाशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आपुलकी, साधेपणा आणि संवेदनशीलता हीच त्यांच्या मोठेपणाची खरी ओळख होती. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या क्रीडाप्रेमाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शिक्षणासोबत क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्व मिळावे, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांनी उभारलेल्या शिक्षणविश्वात ज्ञानासोबत क्रीडेलाही महत्त्वाचे स्थान मिळाले. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विचारांचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’ हा संत ज्ञानेश्वरांचा संदेश आणि डॉ. डी. वाय. पाटील यांचे जीवनकार्य यांच्यात एक सुंदर नाते दिसते. ज्ञानेश्वरांनी शब्दांतून ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला, तर डॉ. पाटील यांनी संस्थांच्या माध्यमातून त्या ज्ञानाची ज्योत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

खरी आदरांजली…
डॉ. पाटील यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे असल्याचे सांगत आमदार गोरखे म्हणाले, फोटोला हार घालणे किंवा श्रद्धांजलीचे शब्द बोलणे एवढीच खरी आदरांजली नाही. त्यांनी आपल्यासाठी एवढे केले, आता आपण समाजासाठी काय करणार, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. एखादा विद्यार्थी घडवणे, गरजूला मदत करणे, ज्ञानाची वाटणी करणे आणि पुढील पिढीसाठी काहीतरी निर्माण करणे, हीच डॉ. डी. वाय. पाटील साहेबांना खरी मानवंदना ठरेल. डॉ. डी. वाय. पाटील साहेब आज देहाने आपल्यात नाहीत; मात्र त्यांनी उभारलेल्या प्रत्येक शिक्षणसंस्थेत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांत, शिक्षकांच्या मार्गदर्शनात, डॉक्टरांच्या सेवेत आणि समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक हातात ते सदैव जिवंत राहतील,” अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.बी. डी. कोटकर, श्री.अभय कोटकर, श्री.कुस्तुभ गावडे, सौ.मंगलाताई कदम यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.