बातम्या *प्लॅस्टिकमुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी सिक्कीम अभ्यास दौऱ्याचे आयोजन करा..*पत्रकार संघाची मागणी July 2, 2023July 2, 2023 Editor पिंपरीसखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी (दि. ०१ जुलै २०२३) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ साली प्लॅस्टिक मुक्त भारत चा नारा दिल्याने सर्वात प्रथम सिक्कीम राज्याने प्लॅस्टिक बॅग मुक्तचा आदर्श संपूर्ण देशाला घालून दिला. सिक्कीम राज्याने प्लॅस्टिक मुक्त राज्यासाठी काय काय उपाय योजना केल्या ? कोणकोणते पर्याय केले? याची सविस्तर माहिती पत्रकारांना व्हावी तसेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणविषयक जनजागृतीपर उपक्रमास हातभार लावण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांचा ” सिक्कीम ” येथे अभ्यास दौरा आयोजित करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे शुक्रवारी केली असून आयुक्त सिंह यांनी या दौऱ्यास तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती पत्रकार व पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी दिली.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. अनेक प्रयत्न करून ही प्रशासनाला हवे तेवढे यश आले नाही. आज ही शहरात प्लॅस्टिक चा वापर सर्रासपणे चालू आहे. त्यासाठी अनेक दुकानात धाडी टाकल्या जातात,प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारला जातो मात्र प्लॅस्टिकचा शहरातील वापर पूर्णपणे थांबलेला नाही.पिंपरी चिंचवड शहर प्लॅस्टिक मुक्त व्हावे यासाठी खुद आयुक्त शेखर सिंह प्रयत्नशील आहेत. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक बंद व्हावे यासाठी पुढाकार घेतला असून प्लॅस्टिक बंद करण्यासाठी ज्या राज्याने देशात पहिला आदर्श घालून दिला. प्लॅस्टिक बॅग मुक्त म्हणून राज्याचे नाव देशपातळीवर गाजविले त्या सिक्कीम राज्याचा आभ्यास दौरा करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे आज महापालिका आयुक्त व प्रशासक श्री शेखर सिंह यांच्याकडे केली असून दौऱ्याचे महत्व लक्षात घेऊन आयुक्त सिंह यांनी ही पत्रकारांच्या शिष्टमंडळास तत्वतः मान्यता दिली आहे.महापालिकेतर्फे अनेक आभ्यास दौरे आयोजित केले जातात मात्र शहरातील गंभीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आयोजित केलेले दौरे हे नेहमी शहराच्या हिताचेच ठरत आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पत्रकारांचा सिक्कीम दौरा आयोजित केल्यास पत्रकार प्लॅस्टिक बंद करण्यासाठी सिक्कीम राज्यातील अधिकाऱ्यांनी ज्या पर्यायांचा वापर केला त्या पर्यायांची सविस्तर घेऊन ती माहिती बातमीच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहरवासीयांना देवून प्रसार व प्रचार करतील त्यामुळे शहर प्लॅस्टिक मुक्त होण्यास निश्चित मदत होईल असे अनेक जाणकार पत्रकारांना वाटते. त्यामुळे आयुक्तांनी शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या सिक्कीमच्या दौऱ्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी केली Post Views: 132