पत्रकारिता हे पैसे कामविण्याचे साधन नव्हे तर सामाजिक सेवा ! ; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी | सखी न्युज लाईव्ह पत्रकारिता ही सामाजिक सेवा आहे. परंतु सध्याच्या काळात त्याचा व्यवसाय झाला आहे. कोणत्याही सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचा दुरुपयोग करू नये. मात्र सध्याची पत्रकारिता ही मालकांच्या दावणीला बांधली गेली आहे. यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी पत्रकारिता टिकविण्याचे आव्हान समाजासमोर आहे. असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सडेतोड मत व्यक्त केले.

   आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मधू जोशी, शिवाजीराव शिर्के, नाना कांबळे, माधवराव सहस्त्रबुद्धे, राजन वडके या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते. नाना कांबळे यांनी प्रास्ताविक तर दादा आढाव यांनी आभार मानले.