पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा

SAKHI NEWS LIVE:-

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात  सध्या ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.  दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आठ टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरण  शंभर टक्के भरले होते. मात्र, यावर्षी वेगळी परिस्थिती दिसत आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण गेल्या वर्षी शंभर टक्के भरले होते. त्याच बरोबर पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झाला होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी एकूण २ हजार ४६० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर, यावर्षी गेल्या २४ तासांत १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या १२ तासात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ४०.४४  टक्के धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे.

आधीच वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड शहरवासीय दिवसाआड पाण्याचे संकट झेलत आहेत. त्यात, ऑगस्ट महिना उजेडला तरी पवना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे आणखी पाणी कपातीचे संकट पिंपरी-चिंचवडकरांवर होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला असून पाऊस असाच सुरू राहिल्यास लवकरच पवना धरण शंभर टक्के भरेल यात काही शंका नाही.